अभय व्हनवाडेरूकडी/माणगांव : राजस्थानच्या जालोरमधील जालोरमधील अवघ्या ९ वर्षांच्या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला सवर्णांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी प्यायला या कारणासाठी अत्यंत क्रूरपणे शिक्षकाने जीवे ठार मारले. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल, गुरुवारी (दि.१८) सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढण्यात आली. शिवाजी चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. याठिकाणी समित माने यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तर, आज, शुक्रवारी (दि.१९) गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला गावकरांनी प्रतिसाद देत आज, शुक्रवारी सर्व व्यवहार बंद करून घटनेचा निषेध व्यक्त केला.काल, झालेल्या रॅलीत समाजाचे अध्यक्ष मुरलीधर कांबळे, हातकणगंले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन कांबळे, बताशा कामत, समित माने, प्रदीप माने, नितीन कांबळे, अजय निंबाळकर, अवि सनदी, संघर्ष माने, बाळासो कांबळे व बौद्ध समाज बांधव सहभागी होते.तर, घटनेतील संबंधित व्यक्तीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी राजस्थानचे मुख्यमंञी अशोक गेहलोत याच्याकडे निवेदनाव्दारे सरपंच राजू मगदूम, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केली.
राजस्थानात दलित विद्यार्थ्यांची हत्या; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:31 PM