Maratha Reservation :विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे शुक्रवारी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:22 PM2021-05-26T19:22:03+5:302021-05-26T19:23:52+5:30
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने केली. या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने केली. या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात समाजबांधवांनी विविध सूचना, मते मांडली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तातडीने विशेष अधिवेशन राज्य सरकारने बोलवावे. त्याबाबत जिल्ह्यातील आमदार, खासदारांना निवेदन देण्यात येईल.
अधिवेशनाच्या मागणीसाठी उद्या सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यामध्ये मराठा बांधव हे काळ्या फिती लावून सहभागी होतील. सरकारने विशेष अधिवेशन घेतले नाही तर समाजाची बैठक घेऊन पुढील आंदोलन ठरविले जाईल, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदार यांनी छत्रपती शिवाजी चौकात यावे, असे आवाहन महेश जाधव यांनी केले. आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने विशेष कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवासराव साळोखे यांनी केले. तज्ज्ञ वकिलांची परिषद घेऊन त्यांनी मांडलेल्या सूचना पुनर्विचार याचिकेमध्ये समाविष्ट कराव्यात, अशी सूचना ॲड. अशोकराव साळोखे यांनी केली. कायदेशीर टिकणाऱ्या आरक्षणासाठी लढा देणे आवश्यक आहे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे जास्तीत जास्त लाभ द्यावेत, अशी मागणी बाबा इंदुलकर यांनी केली.
या बैठकीत दिलीप देसाई यांनी आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सवलती द्याव्यात. त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन राज्य सरकारने घ्यावे, या मागणीचा ठराव मांडला. तो उपस्थितांनी मान्य केला. यावेळी दिलीप पाटील, फत्तेसिंह सावंत, श्रीकांत भोसले, स्वप्निल पार्टे, दिलीप सावंत, संदीप मोहिते, राजेंद्र चव्हाण, मंजित माने, आदी उपस्थित होते. सुरेश जरग यांनी आभार मानले.