लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नदी बुडीत क्षेत्रातील ६ हजार हेक्टर उसासह भात पीक धोक्यात आले आहे. पावसामुळे डोंगरमाथ्याच्या शेतीत मातीचा गाळ साचला आहे तर ओढे, नाल्याच्या प्रवाहात दगड गोठ्यांच्या अडथळ्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलल्याने शेती वाहून गेली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ऊस पीक भुईसपाट झाल्याने उत्पादनात घट येणार आहे. शासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून त्वरित भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यंदा तालुक्यात कमी वेळेत जादा पाऊस पडला. साधारणपणे २३ जुलै रोजी तालुक्यात २०७ मिलिमीटर पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली. त्यामुळे तालुक्यांतील कासारी, कुंभी आणि वारणा या नद्यांनी आतापर्यंतच्या महापुराचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून पुराचा उच्चांक गाठल्याने पूरबाधित क्षेत्रात वाढ होऊन नुकसानीचे प्रमाण वाढणार आहे. पूरबाधित १२८ गावांतील १८ हजार ८२९ शेतकऱ्यांच्या ५ हजार ८२६ हेक्टर क्षेत्रातील पिके महापूर आणि अतिवृष्टीमुळे धोक्यात आल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात माती आणि दगडाचा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पावसाचे पाणी शेती पिकात शिरल्याने बांध फुटून शेतीसह पिके वाहून गेली आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे ऊस पीक जोमात असल्याने शेतकरी खुश होता; परंतु महापुराने होत्याचे नव्हते केले आहे. गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी तिन्ही नद्यांचा पूर संथगतीने ओसरत आहे. त्यामुळे नदीबूडक्षेत्रातील नुकसानीचे टक्केवारी वाढण्याची भीती आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने नदी काठची तर डोंगरमाथ्याची शेती तुटल्याने शेती पिके वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.
पूरबाधित क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिंकाची वर्गानुसार आकडेवारी अशी
ऊस क्षेत्र -३,९६३
भात क्षेत्र- १,१९४
भुईमूग - १७३
ज्वारी- ९९
सोयाबीन- ३७८
भाजीपाला- १८