बाळेघोल येथील धोकादायक वळण ठरतंय अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:27+5:302021-05-25T04:27:27+5:30
लाॅकडाऊनमुळे कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांकडून कडेकोट तपासणी केली जात आहे. परिणामी निपाणी मार्गे गडहिंग्लज, आजरा, आदी भागात जाणे अडचणीचे ...
लाॅकडाऊनमुळे कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांकडून कडेकोट तपासणी केली जात आहे. परिणामी निपाणी मार्गे गडहिंग्लज, आजरा, आदी भागात जाणे अडचणीचे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून थेट कागल-गोरंबे- सेनापती कापशी मार्गे गडहिंग्लज व कोकणात जाण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची ये-जा सुरू आहे. आठवड्यातून एखाद दुसरा अपघात या ठिकाणी होतो.
या मार्गावर बाळेघोलनजीक असणाऱ्या आंबेओहोळ ओढ्यावर धोकादायक वळण आहे. वळणालगतच अरुंद पूल आहे. यामुळे या ठिकाणी आजपर्यंत अनेकवेळा अपघात झाले आहेत. वळणाचा अंदाज न आल्याने मोटारसायकल, ट्रॅक्टर व महागड्या चारचाकी गाड्या थेट पुलाचे कठडे तोडून ओढ्यात कोसळळ्या आहेत. सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही.
या ठिकाणी असणाऱ्या ओढ्यावरील पूलही अरुंद व कमकुवत झाला आहे. तरीही या पुलावरून धोकादायक वाहतूक सुरूच आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार? असा सवाल ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
चौकटः
सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार?
सावित्री खतकल्ले, सरपंच बाळेघोल
हा पूल अत्यंत अरुंद असून या ठिकाणी असणाऱ्या धोकादायक वळणामुळे वारंवार अपघात होत आहेत. साधे दिशादर्शकसुद्धा लावण्याचा त्रास सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतलेला नाही. आजपर्यंत अनेकवेळा या ठिकाणी अपघात होऊनही या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
फोटो : अपघातास निमंत्रण ठरत असलेल्या बाळेघोल (ता. कागल) येथील धोकादायक वळणावर क्रुझर गाडी पुलाचा कठडा तोडून उलटली.