दौलत देसाई कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 02:09 PM2019-02-09T14:09:49+5:302019-02-09T14:14:14+5:30
कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दौलत देसाई यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची बदली अद्याप झालेली नाही. मंत्रालयातून सोमवारी (दि. ११) कार्यमुक्त झाल्यानंतर बहुधा बुधवार (दि. १३) नंतर येथे रुजू होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई हे सध्या मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागात आपत्ती व्यवस्थापन संचालक म्हणून काम करीत होते. ते मूळचे कणकवली येथील आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दौलत देसाई यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची बदली अद्याप झालेली नाही. मंत्रालयातून सोमवारी (दि. ११) कार्यमुक्त झाल्यानंतर बहुधा बुधवार (दि. १३) नंतर येथे रुजू होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई हे सध्या मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागात आपत्ती व्यवस्थापन संचालक म्हणून काम करीत होते. ते मूळचे कणकवली येथील आहेत.
जिल्हाधिकारी सुभेदार हे गेली दोन वर्षे या पदावर आहेत; परंतु कौटुंबिक कारणास्तव त्यांनी शासनाकडे बदलीची मागणी केली आहे. मुंबईत कुठेही बदली व्हावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांची बदली होईल. नवे जिल्हाधिकारी देसाई हे भारतीय प्रशासन सेवेतील २००८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. गेली २३ वर्षे त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
मुंबईत सेल्स टॅक्स अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द १९८८ ला सुरू झाली. त्यानंतर त्यांनी सोलापूर, फलटण, वाई, पुणे येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ‘मेडा’कडेही काम केले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.
मुंबईत नुकतीच झालेली आपत्ती व्यवस्थापनातील वर्ल्ड काँग्रेस यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. ‘आॅस्ट्रेलियन रेन्युएबल एनर्जी अॅँड एनर्जी इफिन्शियन्सी पॉलिसीज’ या विषयांचा त्यांनी अभ्यास केला आहे. वातावरणातील बदल, शाश्वत ऊर्जा या विषयांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
शिवाजी पूलप्रश्नी महत्त्वाची मदत
आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक म्हणून देसाई यांची कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामास परवानगी देण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे येथे येण्याअगोदरपासूनच ते जिल्ह्यातील प्रश्नांचे जाणकार आहेत.
कोल्हापूर हा विकासाच्या प्रवाहातील महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणे याचा मला आनंदच आहे. या संधीचा उपयोग करून अधिकाधिक चांगले काम करून दाखविण्याचा माझा प्रयत्न राहील.
- दौलत देसाई
नूतन जिल्हाधिकारी, कोल्हापूर