हणबरवाडीतील बाळतीण, अर्भकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:14 AM2021-02-20T05:14:28+5:302021-02-20T05:14:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दिंडनेर्ली : हणबरवाडी (ता. करवीर) येथील महिलेचा व अर्भकाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याने इस्पुर्ली येथील दवाखाना ...

Death of a baby girl in Hanbarwadi | हणबरवाडीतील बाळतीण, अर्भकाचा मृत्यू

हणबरवाडीतील बाळतीण, अर्भकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

दिंडनेर्ली :

हणबरवाडी (ता. करवीर) येथील महिलेचा व अर्भकाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याने इस्पुर्ली येथील दवाखाना व सीपीआर बाहेर महिलेच्या नातेवाइकांनी ठिय्या मारला होता. श्वेता धनाजी वाडकर (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. उपचारात हलगर्जीपणा करून नातेवाइकांची दिशाभूल करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकरी आणि नातेवाईक यांनी घेतला होता.

दरम्यान, करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सहमती दिली.

अधिक माहिती अशी की, हणबरवाडी येथील श्वेता धनाजी वाडकर यांना गुरुवारी (दि. १८) बाळंतपणासाठी इस्पुर्ली येथील खासगी माहेर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सकाळी दहाच्या दरम्यान तिची सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा ते सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. दुपारनंतर तिला वेदना असह्य होऊ लागल्या. सायंकाळी ७ वा. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सिझर केले. यामध्ये बाळाचा मृत्यू झाला आणि रात्री अचानकपणे महिलेची प्रकृती खालावल्यामुळे तिला रक्त चढवण्याची गरज असल्याने डॉक्टरांच्या सांगण्यानुसार नातेवाइकांनी एक बॅग रक्त उपलब्ध केले, पण प्रकृती खालावत गेल्यामुळे संपूर्ण बाटली रक्त देता आले नाही. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. पहाटे १०८ या रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये बाळंतणीला पाठवत होते, पण रुग्ण महिला मृत झालेली असल्याचे रुग्णवाहिकेतील पायलटच्या लक्षात आले. तेव्हा त्या पायलटने मृत व्यक्तीस रुग्णवाहिकेतून नेता येणार नसल्याचे सांगितले. तेव्हा संबंधित डॉक्टर व पायलट यांच्यात वादावादी झाली. तेव्हा पायलट यांनी रुग्णवाहिकेतून घेऊन जातो व प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर या महिलेची तपासणी करू देत. त्यानंतरच सी.पी.आर.ला जाऊ असे सांगताच खासगी डॉक्टरांनी संबंधित महिला मृत असल्याचे सांगितले. ही बाब नातेवाइकांना कळताच ग्रामस्थ व नातेवाइकांनी बाळाच्या आणि बाळंतिणीच्या मृत्यूला स्वतः डॉक्टर जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण झाल्यानेे तेथे इस्पुर्ली पोलीस दाखल झाले. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी पंचनामा केला. थोड्या वेळानंतर स. पो. निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करू, अहवाल घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचे मत घेऊन गुन्हा दाखल करू, असेे सांगितलेे. दरम्यान, सर्व जमाव मृतदेहासह सीपीआरकडे गेला व सीपीआरच्या दारात ठिय्या मांडला. या ठिकाणी करवीरचे उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांची व नातेवाइकांची समजूत काढली. संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

श्वेताचा पती धनाजी हा प्लंबिंगचे काम करतो. धनाजीचे वडील मृत असून घरी आई एकटीच असते. त्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. श्वेताचे माहेर सांगवडे (ता. करवीर ) येथील असून आई गुरुवारपासून तिच्यासोबत दवाखान्यात होती. या घटनेनंतर तिच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

जन्मजातच नवजात अर्भक मृत होते, याची स्थिती नातेवाइकांना सांगितली होती तसेच महिलेवर योग्य उपचार चालू होते, पण पहाटे उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पुढील उपचार सीपीआरमध्ये करणे गरजेचे होते यासाठी रुग्णवाहिका बोलविली होती.

डॉ. रेश्मा शिंदे

फोटो..

हताश होऊन बसलेले श्वेताचे आई, नातेवाईक

Web Title: Death of a baby girl in Hanbarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.