कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धन यासाठी ठाकरे यांनी सोमवारी वर्षा या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रामुख्याने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी यड्रावकर यांनी या मंदिराचे पुरातन महत्त्व आणि दरवर्षी कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे होणारे या प्राचीन मंदिराचे नुकसान याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली. यानंतर या मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट आय. आय. टी., मुंबईमार्फत करण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवून संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यासाठीचा निधीही महाराष्ट्र शासन मंजूर करेल, असे सांगितले.
मंदिर व परिसराचा विकास आराखडा प्रशासकीय मान्यतेस सादर झाला असून, येत्या आठवड्यात शासन निर्णय निर्गमित करणार असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीस मंत्री एकनाथ शिंदे, अमित देशमुख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, एमएसआरडीसीचे मोपवलकर, पुलकुंडवार, पुरातत्त्व संचालनालयाचे तेजस गर्गे आदी उपस्थित होते.