ओबीसी आरक्षणात मराठा समाजाच्या अतिक्रमणाचा डाव हाणून पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 05:30 PM2021-02-13T17:30:53+5:302021-02-13T17:38:06+5:30
OBC Reservation Kolhapur- घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या ५२ टक्के आरक्षणात मराठा, जाट यांच्यासारखा क्षत्रीय, जमिनदार समाजाचा शिरकाव करण्याचा डाव देशभर सुरु आहे, तो खऱ्या ओबीसींनी संघटीतपणे हाणून पाडावा, असे आवाहन श्रमिक ओबीस महासंघाचे श्रावण देवरे यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही, द्यायचेच आहे तर ईडब्लूएसची आरक्षण मर्यादा १० वरुन २५ टक्केपर्यंत वाढवावी आणि खुशाल द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर: घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या ५२ टक्के आरक्षणात मराठा, जाट यांच्यासारखा क्षत्रीय, जमिनदार समाजाचा शिरकाव करण्याचा डाव देशभर सुरु आहे, तो खऱ्या ओबीसींनी संघटीतपणे हाणून पाडावा, असे आवाहन श्रमिक ओबीस महासंघाचे श्रावण देवरे यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही, द्यायचेच आहे तर ईडब्लूएसची आरक्षण मर्यादा १० वरुन २५ टक्केपर्यंत वाढवावी आणि खुशाल द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात शनिवारी श्रमिक ओबीसी महासंघातर्फे शाहू स्मारकमध्ये पहिली ओबीसी सक्षमीकरण परिषद झाली. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसह सहकारी संस्थातील प्रतिनिधीत्व व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीचे १८ ठराव एकमताने मंजूर झाले.
परिषदेचे अध्यक्ष म्हणून बोलताना नाशिकचे श्रावण देवरे म्हणाले, ओबीसी समाज कायम दुर्बलच राहावा, असे जाणिवपुर्वक प्रयत्ना होताना दिसत आहे. मराठा, जाट हा बलवान समाज आहे, ते ओबीसीमध्ये आले तर खरे ओबीसी आपोआपच मागे पडणार आहेत. देशातील ५२ टक्के असणाऱ्या या बहुजन समाजाच्या दृष्टीने हे घातक असल्यानेच आता ओबीसी समाजाने हक्कासाठी अधिक जागरुक राहिले पाहिजे. एसईबीसी म्हणजेच ओबीसी आहे, फक्त शब्दांचा छल करुन ओबीसींना फसवले जात असल्याचेही देवरे यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना डॉ. आनंद गुरव यांनी आरक्षणामुळे का असेना गावात ओबीसी पद, मान मिळत आहे, पण उच्च समाजातील लोक अजूनही पद देऊन उपकार केल्याची भाषा वापरत असल्याचे चित्र असल्याचे सांगत ओबीसीनी स्वाभिमानाने आणि अभिमानाने लोकशाहीने दिलेल्या हक्काचा वापर करावा असे सांगितले.
परिषदेतील प्रमुख ठराव
- ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी
- ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे
- मराठा आरक्षणाला पाठींबा पण ओबीसीतून नको
- धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, विणकरांना ओबीसीत घ्या
- सहकारी नोकरी व संस्थामध्ये ओबीसी प्रतिनिधी घ्या
- बढतीतील आरक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करा
- बँकांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा करण्यास सांगा