कोल्हापूर : प्लेटमधील समोसामध्ये पाल असलेले फोटो सोशल मीडिया व वृत्तपत्रांत देऊन, दुकानाची बदनामी करण्याची भीती घालून कसबा बावडा येथील दुकानमालकाकडून १० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सोमवारी (दि. ११) आणखी एक गुन्हा दोघा सराईतांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला.
संशयित स्वप्निल सुरेश सातपुते (वय ३०, रा. यादवनगर), विजय रघुनाथ शिंदे (३५, रा. कळवा, ठाणे) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनी हल्ला, लूटमार, हाणामारी, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी सांगितले, कसबा बावडा येथे शशींद्रन चातुकुट्टी काराई (५४) यांचे मिठाईचे दुकान आहे. ५ आॅक्टोबरला दुपारी संशयित स्वप्निल सातपुते आणि विजय शिंदे यांनी प्लेटमधील समोसामध्ये पाल असल्याचे दाखवून त्याचे फोटो सोशल मीडिया व वृत्तपत्रांत देऊन दुकानाची बदनामी करण्याची भीती दुकानमालकांना दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने १० हजार रुपये घेतले होते.
यापूर्वी राजारामपुरीतील नवव्या गल्लीतील दीपक भुराजी पुरोहित यांच्या मिठाईच्या दुकानात अशा प्रकारची भीती दाखवून खंडणीची मागणी केली होती. त्यामध्ये संशयितांना अटक केल्यानंतर आपल्या ठिकाणी अशीच फसवणूक झाल्याचे फिर्यादी काराई यांच्या लक्षात आले.
त्यांनी शाहूपुरी पोलिसांत दोघांविरोधात फिर्याद दिली. संशयितांनी अशा प्रकारे आणखी किती दुकानदारांना भीती दाखवून खंडणी वसूल केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत. सध्या दोघेही राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात आहेत.