कोल्हापूर: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी 3 फेब्रुवारीपासून होणाऱ्या लोकशाही दिनाला मी स्वत: तसेच पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित राहणार आहेत.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी 11 ते 2 या वेळेत होणाऱ्या लोकशाही दिनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.ग्राम विकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित असणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि महामंडळे यांच्या कडील प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांबाबत नागरिकांनी निवेदने घेवून यावीत. नागरिकांचे प्रश्न अधिकाऱ्यांनी सोडविले पाहिजेत.
योग्य काम होणार असेल तर ते तात्काळ झाले पाहिजे. होणार नसेल तर का होणार नाही त्याचे उत्तर हे संबंधिताला दिले पाहिजे. नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये विनाकारण हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी हा आमचा प्रमाणिक प्रयत्न आहे.कावळा नाका येथील जुन्या विश्रामगृहात आमच्या तिघांचेही लवकरच संपर्क कार्यालय सुरु होणार आहे. महिन्यातून एकदा होणाऱ्या लोकशाही दिना व्यतिरिक्त नागरिकांनी इतर वेळीही आपल्या समस्या, अडचणी याबाबत संपर्क कार्यालयात पत्रव्यवहार करुन संपर्क साधावा. येथे नियुक्त असणारे अधिकारी त्याबाबत संबंधित नागरिकांना उत्तर देतील. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.