कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे उभारण्यात आलेल्या मदरशाचे बांधकाम आज गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मुस्लीम समाज स्वत: उतरवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दिली. तर, आज गुरुवारी सकाळपासून मदरशाचे हे बांधकाम उतरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही शासनाची वर्ग २ ची जमीन असून बेकायदेशीर खरेदी-विक्री व शर्तभंग झाल्याने अशी वास्तू संरक्षित करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे मदरसा उतरवून घ्या व त्यानंतर नियमाने परवानगी घेऊन नव्याने उभारणी करा, असा समजूतदारपणे निर्णय झाला आहे. जमिनीसंबंधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितले.लक्षतीर्थ वसाहतीत शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला मदरसा पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याविरोधात मुस्लीम समाजाने केलेली स्थगितीची मागणी बुधवारी न्यायालयाने फेटाळली. हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव व मुस्लीम बांधवांचा रोष या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी तसेच मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, तौफिक मुलाणी, जाफरबाबा यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते. यानंतर बैठकीतील निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकारांना दिली.जिल्हाधिकारी म्हणाले, आज सकाळी ८ वाजता मुस्लीम समाज स्वत: मदरसा उतरवायला सुरुवात करेल. त्यांना महापालिकेचे कर्मचारी मदत करतील. जमीन वर्ग २ मधील असून मालक शासन आहे. १९९७ साली जमिनीचा व्यवहार करताना परवानगी घेतलेली नाही. न्यायालयानेदेखील ही निदर्शने नोंदवत मदरसा उतरवून घेण्याचा निकाल दिला आहे. नव्याने प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. त्यानुसार मदरसा उभारण्यासाठी समाजाने जमीन वर्ग १ करून रितसर परवानगी घ्यावी त्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल.न्यायालयातूनही दिलासा नाहीयावेळी मुस्लीम समाजाने या प्रकरणावर २ तारखेला सुनावणी आहे. तोपर्यंत प्रशासनाने कारवाई थांबवावी, अशी विनंती केली. मात्र यावर जिल्हाधिकारी म्हणाले, त्या जमिनीचे हस्तांतरणच बेकायदेशीर झाल्याने न्यायालयातूनही दिलासा मिळणार नाही. उलट समाजात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. सामंजस्याने स्वत:हून मदरसा उतरवून घेतल्यास चांगला संदेश समाजामध्ये जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आज कोल्हापूर बंद नाहीकोल्हापूर आज गुरुवारी कोल्हापूर बंदची कोणत्याही संघटनेने घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवहार नियमितपणे सुरळीत राहणार आहेत. दरम्यान साेशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, व्टिटरसारख्या सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या, अवमानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा संदेश प्रसारित करू नयेत अन्यथा माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Kolhapur: अनधिकृत मदरशाचे बांधकाम उतरवण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 11:28 AM