कोल्हापूर : भाजप-शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळेच तिवरे धरण फुटून, तसेच मालाड येथील भिंत कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा कॉँग्रेस रस्त्यावर उतली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, दाभोळकर कॉर्नर येथे कार्यकर्त्यांनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन पेट्रोल दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविला.सकाळी अकरापासून स्टेशनरोडवरील कॉँग्रेस कमिटी कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आंदोलनासाठी बाहेर पडले. दाभोळकर कॉर्नर येथील पेट्रोलपंपावर नागरिकांना गुलाब पुष्प देऊन कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. यानंतर सर्वजन वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
या ठिकाणी तीव्र निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. यानंतर जिल्हाध्यक्ष आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अॅड. सुरेश कुराडे, अॅड. गुलाबराव घोरपडे, तौफिक मुल्लाणी, प्रकाश सातपुते, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, जि. प. सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.गेल्या पाच वर्षांपासून भाजप-शिवसेना सरकारने सातत्याने भ्रष्टाचाराला संरक्षण देऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीन चिट देण्याचे काम केले आहे. विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे, आरटीआयचे कार्यकर्ते यांनी अनेकदा हे पुरावे समोर आणूनही त्याची दखल घेतलेले नाही. परिणामी, या भ्रष्ट कारणाने दुर्दैवी घटना घडून निरपराधांना आपला जीव गमवावा लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटलेली व मालाड येथील भिंत कोसळून जीवितहानी झालेल्या घटना याचे ताजे उदाहरण आहे. तसेच राज्यात खरिपाचा हंगाम सुरू होऊनही अद्याप बॅँकांनी पुरेशा प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्याचबरोबर पुढील सर्व निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.आंदोलनात सदाशिव चरापले, हिंदुराव चौगले, एस. के. माळी, किशोर खानविलकर, रवींद्र मोरे, संजय पोवार-वाईकर, संपतराव चव्हाण-पाटील, रणजित पोवार, शंकरराव पाटील, प्रदीप शेलार, सुलोचना नायकवडे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, मुनाफ बेपारी, संग्राम गायकवाड, सुशील पाटील-कौलवकर, महंमद शरीफ शेख, दीपक थोरात, मंगल खुडे, आदींचा समावेश होता.