अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या उपअधीक्षक बापूसाहेब चौगले यांनी कुस्ती पंढरी अशी ओळख असलेल्या मुरगूडच्या जगदंबा तालमीत कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवले. नंतर ते कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत दाखल झाले. येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग व बी. टी. भोसले यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड, गारगोटी, बानगे, म्हसवे, अर्जुनवाडा, कोपार्डे, वाकरे, इचलकरंजी, सरवडे, कागल येथील अनेक मैदानांत त्यांनी प्रेक्षणीय मैदानी कुस्त्या केल्या. याशिवाय स्पर्धात्मक कुस्ती स्पर्धेत ज्युनिअर ऑल इंडिया स्पर्धेत कांस्य पदक, ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेत दिल्ली येथे सहभाग तर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कुस्ती व कब्बडी खेळात सहभाग नोंदवत त्यांनी सलग तीन वर्षे अजिंक्यपद मिळवले होते. मुरगूडच्या स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना, चार भाऊ असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक बापूसाहेब चौगले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:25 AM