कर्तव्यात कसूर; एलसीबीतील तिघांचे निलंबन, पोलीस अधीक्षकांचा दणका
By उद्धव गोडसे | Published: December 12, 2023 08:49 PM2023-12-12T20:49:18+5:302023-12-12T20:49:24+5:30
पोलिस अधीक्षक पंडित यांनी सर्वच शाखा आणि पोलिस ठाण्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन पोलिसांना निलंबित केले. सोमवारी (दि. ११) रात्री हा आदेश काढण्यात आला. सहायक फौजदार संभाजी कृष्णात भोसले, पोलिस हवालदार पांडुरंग तुकाराम पाटील आणि कॉन्स्टेबल संदीप ज्ञानदेव गायकवाड अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक पंडित यांनी सर्वच शाखा आणि पोलिस ठाण्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, काही पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर कारवाईला सुरुवात झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तिघांना निलंबित केले. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे हे वैयक्तिक कारणास्तव रजेवर गेल्याने त्यांचा तात्पुरता कार्यभार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील १४ पोलिसांवर गेल्याच महिन्यात अधीक्षकांनी कारवाई केली होती. काही गुन्ह्यांच्या तपासाबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही पोलिसांकडून सुरू असलेल्या अवैध प्रकारांचीही माहिती कानावर आल्यामुळे त्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेवर विशेष नजर होती. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.