पात्र असूनही अनेकजण रेशनपासून वंचित : तांत्रिक कारणांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:40 AM2020-04-15T11:40:39+5:302020-04-15T11:41:02+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार टन धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले.
कोल्हापूर : रेशनच्या लाभासाठी पात्र असूनही निव्वळ तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील अनेकजणांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून या लाभार्थ्यांना किमान पुढील महिन्यापासून तरी धान्य पुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार टन धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. धान्याच्या दर्जाबाबत अद्याप तरी कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. असे असले जिल्ह्यातील अनेक पात्र लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे रेशनच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
यामध्ये लाभार्थ्याने कागदपत्रे दुकानदाराकडे सादर करून वर्ष उलटले तरी त्याची आॅनलाईन नोंद झालेली नाही. तसेच रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची संख्या आणि आॅनलाईन नोंद (उदा. कार्डवरील लाभार्थी संख्या १० असल्यास आॅनलाईनद्वारे ती आठजणांची दिसत आहे) याचा मेळ बसत नाही. यामुळे ग्राहक व रेशन दुकानदार यांच्यात वादाचे प्रकार होत आहेत. पॉस मशीनवरील आधार कार्डाची नोंदणीच अद्याप काही ठिकाणी झाली नसल्याचे दिसत आहे. पुरवठा विभागाने या तांत्रिक त्रुटी दूर करून या महिन्याचे नसले तरी पुढील महिन्यापासून तरी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.
तांत्रिक त्रुटीमुळे पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळत नसेल तर या संदर्भात माहिती घेऊन त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न राहील. तसेच या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाईल.
- दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
पॉस मशीनवरील आधार कार्डच्या नोंदणीच्या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक रेशन लाभार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे. त्रुटी दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने तंत्रज्ञ वाढविण्याची गरज आहे.
- रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना
रेशन दुकानांमध्ये अनेक वेळा कागदपत्रे सादर करूनही नोंदणी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पात्र असूनही धान्य मिळत नाही.
- महेश देसाई, रेशन ग्राहक
रेशनवर मिळणारे गहू व तांदूळ तसेच मोफत तांदूळ यांचा दर्जा चांगला आहे. कार्डावर जितके धान्य मंजूर आहे, तितके दिले जात आहे.
- सोनाली पाटील, रेशन ग्राहक