राम मगदूम --गडहिंग्लज --इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवस्थान जमिनीच्या वहिवाटदाराने जमिनीचे विनापरवाना हस्तांतरण करून शर्तभंग केल्यामुळे त्या जमिनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आपल्या ताब्यात घेणार आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिवांनी येथील तहसीलदारांना यासंदर्भातील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी ‘त्या’ जमिनीच्या ‘कब्जेपट्टी’च्या कामासाठी कडगावच्या मंडल अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.शनिवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष जागेवर कब्जा देणे-घेणेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी बेकायदा खरेदी-विक्री झालेल्या देवाच्या जमिनीचा ताबा अखेर देवस्थान समितीच घेणार आहे. त्यामुळे या कारवाईकडे गडहिंग्लजसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहिले आहे.इंचनाळचे प्राचीन गणेश मंदिर सर्वदूर प्रसिद्ध असून, देवाची पूजाअर्चा आणि देखभालीसाठी इनाम मिळालेली सुमारे १२ एकर बागायती शेतजमीन आहे. या जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी-दंडगे यांनी ५६ वर्षांपूर्वी आपला भाऊ मनोहर यांना यासंदर्भात वटमुखत्यारपत्र करून दिले होते. वटमुखत्यार मनोहर यांनी आपल्या प्रापंचिक कारणासाठी स्थानिक देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष व माजी सरपंच आनंदराव पोवार यांना देवस्थानच्या एकूण जमिनीपैकी सहा एकर २९ गुंठे इतकी जमीन अवघ्या १६ लाखाला खरेदीपत्राने विकली. त्यांनी खरेदीचा व्यवहार पूर्ण करून देण्यास टाळाटाळ केल्याने पोवार यांनी न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयानेदेखील धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीनेच हा व्यवहार करण्याची अट घातली.८ सप्टेंबर २००५ रोजी वहिवाटदार गजानन जोशींचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतरही त्यांच्याच नावाने व सहीने देवस्थान जमिनीचा ७/१२ स्वतंत्र होऊन मिळण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला. त्यासंदर्भात कोणतीही शहानिशा न करता तत्कालीन तहसीलदारांनी ‘देवा’च्या जमिनीची खातेफोड करण्याबरोबरच एका हिस्सेची ‘देवस्थान इनाम’ ‘खालसा’ केली. त्याआधारेच हा बेकायदेशीर व्यवहार झाला. मात्र, फेरफारीचा ‘तो’ बेकायदेशीर आदेश प्रांतांनी रद्द केला.जमीन ताब्यात घेण्याचे कारणगणपती देवाची पूजाअर्चा व समाराधना यासाठी वहिवाटदार म्हणून गजानन जोशी-दंडगे यांच्याकडे ही जमीन होती. यासंदर्भात त्यांनी भाऊ मनोहर जोशी यांना वटमुखत्यारपत्र करून दिले. त्याआधारेच मनोहर यांनी आनंदा पोवार यांना करारपत्राने जमीन विकली आहे. गजानन यांचे वारस कोणीही गावी राहत नाही, त्यांचेकडून देवाची पूजा-अर्चा केली जात नाही. तरीदेखील जमिनीचे विनापरवाना हस्तांतर करून शर्तभंग केल्यानेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या जमिनीचा कायदेशीर व रीतसर ताबा घेणार आहे.
देवस्थान समिती घेणार ‘देवा’च्या जमिनीचा ताबा
By admin | Published: April 27, 2016 12:20 AM