कोल्हापूर : पर्यटन वाढीच्या अनुषंगाने कौशल्य विकास कृती आराखडा तयार करावा तसेच विविध भाषा बोलणारे गाईड निर्माण करावेत, अशी सुचना भारत सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे सचिव के. पी. कृष्णन यांनी सोमवारी कोल्हापूर महानगरपालिकेस केली.
केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अत्योंदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंमलबजावणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती घेण्याकरीता भारत सरकार कौशल्य विकास विभागाचे सचिव के. पी. कृष्णन यांनी महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही सुचना केली. त्यांचे स्वागत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान या योजनेमधून ४५ बॅचेस मधून १३१९ विद्यार्थी यशस्वी झाल्याचे तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण केले जात असले यावेळी सांगण्यात आले.
यावेळी कृष्णन यांनी बोलताना कोल्हापूर कौशल्य विकास कृती आराखडा तयार करण्यात यावा. यामध्ये कोल्हापूरची खासियत काय आहे. त्याचे ट्रेंनिंग लाभार्थ्यींना देणेसाठी कोल्हापूर शहराच्या सामाजिक, आर्थिक बाबींचा विचार करुन पर्यटन विकास आराखड्यात इंग्रजी, हिंदी, मराठी, तामिळ, केरळ यासारख्या भाषा बोलणारे गाईड्स तसेच निरनिराळया प्रदेशाचे खाद्य पदार्थ तयार करणे, कोल्हापूरी चप्पल, गुळ यासारखे विविध वस्तू बनविणे असे आराखडे तयार करावेत असे सांगितले. यावेळी उपआयुक्त मंगेश शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, एन.यू.एल.एम.चे निवास कोळी, विजय तळेकर, रोहित सोनुले आदी उपस्थित होते.