कदमवाडीतील धैर्यशील पाटील ‘गेट’ परीक्षेत देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:30 AM2019-03-22T11:30:19+5:302019-03-22T11:32:36+5:30
कदमवाडी (ता. करवीर) येथील धैर्यशील धनाजी पाटील याने ‘गेट २०१९’ परीक्षेत ८४.६७ टक्के गुणांसह बाजी मारली आहे. त्याने या परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘गेट परीक्षा (ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग)’ दि. ३ फेब्रुवारीला घेण्यात आली. त्याचा निकाल दि. १५ मार्चला आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये धैर्यशील याने १००० पैकी ९४५ गुण मिळविले.
कोल्हापूर : कदमवाडी (ता. करवीर) येथील धैर्यशील धनाजी पाटील याने ‘गेट २०१९’ परीक्षेत ८४.६७ टक्के गुणांसह बाजी मारली आहे. त्याने या परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘गेट परीक्षा (ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग)’ दि. ३ फेब्रुवारीला घेण्यात आली. त्याचा निकाल दि. १५ मार्चला आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये धैर्यशील याने १००० पैकी ९४५ गुण मिळविले.
या परीक्षेतील यशामुळे त्याला भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून काम करण्याची आणि बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये पुढील पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. धैर्यशील याचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये झाले.
कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून त्याने मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगची पदवी जून २०१८ मध्ये घेतली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये भिलाई (छत्तीसगड) येथील स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तो रूजू झाला. सध्या या ठिकाणी काम करत त्याने गेट परीक्षेची तयारी केली.
स्वत:च्या नोट्सच्या जोरावर तयारी करून त्याने या परीक्षेत यश मिळविले आहे. त्याचे वडील धनाजी हे कोल्हापुरातील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये फिटर म्हणून काम करतात. आई संगीता या गृहिणी आहेत.
मटेरिअल सायन्समध्ये संशोधन करणार
या परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरींगमध्ये देशात प्रथम क्रमांकाने यश मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. यशासाठी मला आई-वडिलांचे मोठे पाठबळ लाभले. मटेरिअल सायन्समधील संशोधन क्षेत्रात मला करिअर करायचे आहे; त्यासाठी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये रुजू होणार असल्याचे धैर्यशील याने सांगितले.