कोल्हापूर, दि. २७ : येत्या दहा डिसेंबरपासून ऐतिहासिक शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह सभोवतालचा परिसरही सुशोभित केला जाणार आहे. त्यात पुतळ्यासह मूळ चबुतरा तसाच ठेवून सुशोभिकरण करावे, अशी मागणीवजा विनंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी यमकर म्हणाले, गव्हर्नर लेस्ली विल्सन यांचा पुतळा स्वातंत्र्यसैनिक भगिनींनी विदु्रप केला. त्यानंतर तो स्वातंत्र्यसैनिकांनी फोडला. त्यानंतर १४ मे १९४५ साली राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी द ग्रेट’ या तीन खंडांतून लिहिलेल्या शिवकाळाचा बारकाईने विचार करून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी शिवरायांचा पुतळा तयार केला.
हा पुतळा बसविण्यासाठी चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा सहभाग होता. त्यामुळे चित्रपट महामंडळाकडून सुशोभिकरणास विरोध नसून, मूळ ढाच्याला कुठेही स्पर्श न करता तेथील सर्व परिसराचे सुशोभिकरण व्हावे, याबाबत शहरचे आमदार राजेश क्षीरसागर व महापौर हसिना फरास यांना शिष्टमंडळ भेटून याबाबत विनंती करू.
यावेळी महामंडळाचे सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक सतीश बिडकर, अर्जुन नलवडे, अरुण भोसले, सुरेंद्र पन्हाळकर, नगरसेविका सुरेखा शहा, आदी मान्यवर उपस्थित होते.
मागण्या अशा :
- सर्वसमावेशक तज्ज्ञ मंडळींचा सुशोभिकरण समितीत समावेश करावा.
- मूळ चबुतरा, पुतळा, ढाचा यांना कुठेही बाधा न आणता सुशोभिकरण करावे.
- वृत्तपत्रामध्ये दाखविलेल्या आराखड्यानुसार मागील भाग झाकला जाणार आहे तो झाकू नये.
- पुतळा उभा करण्यात त्याकाळी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले. त्यांची चित्रशिल्पे, माहिती द्यावी.
- ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या मुख्य अटींवर स्पर्धात्मक आराखड्याचे आवाहन करावे.
चित्रमहर्षी शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर अनेक चित्रपट निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या प्रभावी माध्यमाद्वारे शिवरायांचा इतिहास, ते कसे दिसत होते हे घराघरांत पोहोचविले. भालजी बाबांनी राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ या तीन खंडातील वर्णनावरून महाराजांचा पुतळा कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्याकडून करून घेतला. पुतळ्याच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. त्यामुळे आम्हा शिष्यांना शिवाजी चौकाच्या सुशोभिकरणात विशेष रस वाटत आहे. सुशोभिकरणास आमचा कदापी विरोध नाही, अशी विनंती वजा मागणी कलामहर्षी भालजी पेंढारकरांचे तत्कालीन स्वीय सहायक अर्जुन नलवडे यांनी केली.