कोल्हापूर : ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरात रविवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध दत्त मंदिरांवर विद्युत रोषणाई, केळीचे खांब, फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या.
भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. विविध मंदिरांत श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी भक्तांनी मंदिरे फुलून गेली होती. शाहू मिलजवळील कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. दरम्यान, शहरासह उपनगरामधील दत्त मंदिरांतही मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली.
कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र (दिंडोरीप्रणीत) येथे श्री दत्त जयंतीनिमित्त रविवारी सकाळी गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायाचे वाचन झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी झाली होती.
दुपारी श्री दत्त जन्मकाळ सोहळा स्वामी समर्थ मंदिरात झाला. त्यानंतर आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. रविवार पेठ आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान दत्त मंदिरात पहाटे अभिषेक, सकाळी आरती झाल्यानंतर गुरुचरित्राचे वाचन करण्यात आले. दत्त महाराज यांची अलंकार पूजा बाळासो दादर्णे, हिंमत दादर्णे यांनी बांधली.
यावेळी भक्तांना मसाले दूध, भात वाटप करण्यात आला. सायंकाळी ६ वाजून १ मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा भक्तांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवसभर कीर्तन,भजन असे धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली.
त्याचबरोबर गंगावेशमधील श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर (निजबोध मठी) येथे पहाटे रुद्राभिषेक झाला. सकाळी आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. दत्त दर्शनासाठी भक्तांची दिवसभर गर्दी होती. सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर रात्री मंदिरापासून भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.
रंकाळावेश बसस्थानक, धोत्री गल्ली, रेगे तिकटीमार्गे निजबोध मठात पालखी आली. दत्त मंदिरातील दत्त सोहळा पाहण्यासाठी भाविकांसाठी मंदिराबाहेर भव्य स्क्रीनची सोय केली होती. त्याचबरोबर रुईकर कॉलनी महाडिक वसाहत, फुलेवाडी दत्त मंदिर, गंगावेशतील दत्त गल्लीमधील दत्त मंदिरांसह विविध मंदिरांत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आज सप्ताहाची सांगता२७ नोव्हेंबरपासून कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ अखंड नामजप यज्ञ याग व सहस्त्रचंडी याग सप्ताह सुरू होता. या सप्ताहाची सांगता आज, सोमवारी सकाळी सत्यदत्त पूजन आणि त्यानंतर सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी महाआरती व प्रसाद वाटपाने होणार आहे.आज महाप्रसादश्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्थेतर्फे मिरजकर तिकटी येथील एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त सकाळी काकडआरती करण्यात आली. त्यानंतर लघुरुद्र अभिषेक, श्री दत्त सहस्त्र नामावली, दुपारी १२ वा. महाआरती करण्यात आली. संतोष महाराज यांनी गंधलेपन करून पूजा बांधली. सायंकाळी जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. आज, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष गिरी गोसावी महाराज यांनी केले आहे.आज पालखी सोहळा, महाप्रसाददत्त जयंतीनिमित्त दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिरतर्फे सोमवारी पालखी सोहळा सकाळी नऊ वाजता पार पडला. बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मीपुरी (आईसाहेब महाराज पुतळा), चांदणी चौक रविवार पेठमार्गे पालखी सोहळा पार पडला. आहे. याठिकाणी आरतीनंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे.