‘दिलबहार’ विरुद्ध ‘फुलेवाडी’

By admin | Published: March 31, 2015 11:20 PM2015-03-31T23:20:47+5:302015-04-01T00:01:04+5:30

शिवाजी मंडळ पराभूत : ‘दसरा चषक’चा मानकरी आज ठरणार

'Dillbahar' against 'Phoolavadi' | ‘दिलबहार’ विरुद्ध ‘फुलेवाडी’

‘दिलबहार’ विरुद्ध ‘फुलेवाडी’

Next

कोल्हापूर : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात ‘फुलेवाडी’ संघाने शिवाजी मंडळावर २-१ अशी गोल फरकाने मात करीत दसरा कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आज, बुधवारी दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे. शाहू स्टेडियमवर मंगळवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये सामना झाला. प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने, सामन्यात मोठी चुरस निर्माण झाली. पाचव्या मिनिटाला फुलेवाडी संघाकडून झालेल्या चढाईमध्ये तेजस जाधवच्या पासवर मोहित मंडलिकची साधी संधी वाया गेली. फुलेवाडी संघाच्या या हुकलेल्या संधीनंतर शिवाजी तरुण मंडळ शॉर्ट पासवर भर देत फुलेवाडी संघाची बचावफळी भेदण्यात यशस्वी झाले. यामध्ये वैभव राऊतने ‘डी’बाहेरून मारलेला फटका गोलपोस्टवरून गेल्याने त्यांचीही संधी हुकली.
यानंतर शिवाजी तरुण मंडळाकडून शिवतेज खराडे, मंगेश भालकर, आकाश भोसले, कुणाल जाधव, अनिरुद्ध शिंदे यांनी, तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाकडून सूरज शिंगटे, अजित पोवार, सुशांत अतिग्रे, मोहसीन बागवान यांनी खाते उघडण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. २६ व्या मिनिटाला फुलेवाडी संघाच्या संकेत वेसणेकरच्या पासवर तेजस जाधवने गोल नोंदवीत सामन्यात १ -० अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर ‘फुलेवाडी’ने थोडा बचावात्मक खेळ केला. सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाला ‘डी’च्या बाहेरून मिळालेल्या फ्री किकवर अमृत हांडेने अप्रतिम गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात फुलेवाडी संघाच्या तेजस जाधवने ५९ व्या मिनिटाला गोल नोंदवीत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. (प्रतिनिधी)


छत्रपती ग्रुप सीनिअर फुटबॉल स्पर्धा उद्यापासून
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळाच्यावतीने उद्या, गुरुवारपासून शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, नेताजी चषक नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा छत्रपती ग्रुप सीनिअर फुटबॉल स्पर्धा नावाने भरविण्यात येणार आहे.
पहिला सामना दुपारी दोन वाजता खंडोबा फुटबॉल क्लब ‘ब’ विरुद्ध छत्रपती संभाजी तरुण मंडळ, गडहिंग्लज यांच्यामध्ये, तर दुपारी चार वाजता गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन विरुद्ध गोल्डस्टार फुटबॉल क्लब यांच्यामध्ये होईल.
स्पर्धेचे हे २२ वे वर्षे असून, विजेत्या संघास रोख ५१ हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास २५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ट फॉरवर्ड, हाफ, डिफेन्स व गोलकीपर अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे यांनी दिली.

Web Title: 'Dillbahar' against 'Phoolavadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.