कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना तर चित्र-तंत्र महर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांना दि. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान कोल्हापुरात होणाऱ्या सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (किफ्फ) मध्ये प्रदान करण्यात येणार आहे.
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, संयोजक दिलीप बापट, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे रणजित जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
राजर्षी शाहू स्मारक भवनात तीन चित्रगृहांत रोज १५ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय रोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुक्त संवाद कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे. दि. १४ रोजी सुभाष घई चित्रपट अभ्यासकांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेणार आहेत.
किल्ले रायगड लघुपटाचे प्रदर्शनया महोत्सवात दि. १८ रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक माधवराव शिंदे दिग्दर्शित आणि बाबासाहेब पुरंदरेलिखित, निवेदित ‘किल्ले रायगड’ यावर लघुपट दाखविण्यात येणार आहे. यावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम संवाद साधणार आहेत.
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी
श्रीमती सुमित्रा भावे (कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार) : १९९५ मध्ये दोघी चित्रपटापासून दृक-श्राव्य माध्यमाचा प्रवास सुरू करणाऱ्या सुमित्रा भावे यांचा वयाच्या पंच्याहत्तरीत निर्माण केलेला ‘कासव’ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांनी १३ हून अधिक चित्रपट, दूरदर्शनवरील मालिकांची निर्मिती केली आहे. न्यूयॉर्क, स्टुटगार्ड, इटली येथील चित्रपट महोत्सवात त्यांचे चित्रपट नावाजले आहेत.
नितीन चंद्रकांत देसाई ( चित्र-तंत्र महर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार) : सन १९८० मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कला शिक्षणात करियर करणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई यांनी तमस, डिस्कव्हरी आॅफ इंडिया, चाणक्य या मालिका, सलाम बॉम्बे, परिंदा, लेकिन, १९४२ अ लव्ह स्टोरी, जंगल बुक यासारख्या चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले आहे. ३० वर्षांच्या कारकीर्दीत अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अनेक गाजलेल्या सेटससाठी त्यांना नावाजले जाते.