अस्वस्थता, उद्विग्नतेला ‘रिंगण’ नाटकातून वाट
By Admin | Published: September 21, 2016 01:01 AM2016-09-21T01:01:11+5:302016-09-21T01:07:03+5:30
राजन गवस : ‘रिंगणनाट्य : कार्यशाळा ते नाटक’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर : डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर लोकांच्या मनातील उद्विग्नता व अस्वस्थतेला एकत्रित करत प्रस्थापित नाटकाला नवे रूपबोध देण्याचं काम ‘रिंगण’ नाटक करते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले.
श्रमिक प्रतिष्ठान व ‘अंनिस’तर्फे मंगळवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे अतुल पेठे व राजू इनामदार यांनी लिहिलेल्या ‘रिंंगणनाट्य : कार्यशाळा ते नाटक’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘अंनिस’च्या कलाकारांनी संविधानाचा पोवाडा सादर केला. यावेळी श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, प्रा. डॉ. मेघा पानसरे उपस्थित होत्या.
डॉ. गवस म्हणाले, चळवळीला, नवी भाषा, रूपबंध मराठी नाटकाच्या साचेबद्दतेतून मुक्त करत नवी दिशा देण्याचे कामकरी कार्यकर्त्यांसाठी नवे पद्धतीशास्त्र ‘रिंगण’ने मांडले आहे. केवळ भाषिक चलाखी न करता हे नाटक प्रश्न उभे करते. सर्जनशील निर्मिती प्रक्रियेच्या शोधाचे हे पुस्तक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
पेठे म्हणाले, सध्या आसपास घडणाऱ्या घटना अवस्थ करणाऱ्या आहेत. अशा परिस्थीतीत गांभीर्याने काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन काम करायला हवे. माणसांनी कसे वागावे यावर निर्बंध लादले जात आहेत. साहित्य, कला, नाटक या कलेवर बंधने लादली जात आहेत. अशा परिस्थीतीत एकत्र येऊन संघर्ष करायला हवे.
गोविंद पानसरे यांच्याशी आपले नाते अंतमुर्ख करणारे होते, असे सांगत पेठे यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले आपण लोकांसाठी मोर्चे काढतो, त्यांच्यासाठी लढतो मागण्या मान्य करायला सरकारला भाग पाडतो परंतु निवडणुकीवेळी आपल्याला जनता मतदान का करत नाही, अशी खंत अण्णा व्यक्त करायचे. त्यावर आपण आता विचार करून याचे उत्तर शोधायला हवे.
डॉ. पानसरे म्हणाल्या, नव्या पिढीपर्यंत चळवळीतील विवेकाचा विचार पोहोचविण्याचे नाटक हे प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध झाले आहे. मोर्चा, सभा, भाषणांपेक्षा नाटकाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये रिंगणच्या माध्यमातून सर्व महाविद्यालयांतील तरुणांपर्यंत विवेकाचा विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
इनामदार म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनातील वेदना कोणतीही हिंसक कृती न करता सनदशीर पद्धतीने निषेध करण्याचा पद्धतीचा ‘रिंगण’ हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.
प्रास्ताविकामध्ये शिरसाठ म्हणाले, चळवळींचे प्रभावी साधन इतकीच नाटकाची कार्यकक्षा न राहता सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक कक्षा रुंदावत सामाजिक भावनांना तीव्र करण्याचं काम ‘रिंगण’ करते.
प्रकाशन समारंभानंतर ‘रिंगण’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. यावेळी पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या विक्रीतून मिळालेले दहा हजार रुपये धनादेश स्वरुपात ‘गोविंद पानसरे युवा जागर मंच’च्या उपक्रमास देण्यात आले.
संघसेन जगतकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)