शेट्टी-आवाडे-मंडलिक यांच्यात चर्चा-ऊसदराबाबत चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:22 AM2017-11-05T01:22:37+5:302017-11-05T01:25:50+5:30
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी शनिवारी जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे व हमीदवाडा कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी ऊसदराबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली. शेट्टी यांनी पहिल्या उचलीबाबत प्रस्ताव द्यावा, त्याबाबत आम्ही सर्व कारखानदारांशी चर्चा करू, असे आवाडे व मंडलिक यांनी सांगितले; परंतु शेट्टी यांनी तसे न करता सर्व कारखानदारांसमवेतच एकत्रित बैठक घ्यावी, तिथे चर्चा करू, असा प्रस्ताव दिला आहे.
शुक्रवारी येथील एका हॉटेलमध्ये कारखानदारांची बैठक झाली होती. त्यामध्ये आवाडे यांनी शेट्टी यांचा पहिल्या उचलीचा नक्की किती रकमेचा प्रस्ताव आहे, हे जाणून घ्यावे व त्यावर कारखानदारांची बैठक घेऊन चर्चा करावी, असे ठरले होते. त्यानुसार शनिवारी आवाडे यांनी शेट्टी यांच्याशी संपर्क साधला; परंतु व्यक्तिगत एका कारखानदाराशी चर्चा करण्यापेक्षा तुम्ही सर्वच कारखानदारांना बोलवा व तिथे एकत्रित चर्चा करू. पहिल्या उचलीबाबत मी लवचिक असल्याचे सुरुवातीपासूनच सांगितले असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर सायंकाळी शेट्टी यांची संजय मंडलिक यांच्याशी भेट झाली.
ऊसदराच्या आंदोलनात सरकार व कारखानदारांनी शेतकºयांची कोंडी केल्यास ती फोडण्याचे काम आतापर्यंत दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांनी केले; हीच परंपरा तुम्ही पुढे न्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले. त्यास मंडलिक यांनीही प्रतिसाद दिला. आवाडे व मी कारखानदारांशी एकत्रित बोलून तुमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवितो व चर्चा घडवून आणू, असे आश्वासन मंडलिक यांनी दिले. सांगलीतील कारखानदारांची आज, रविवारी बैठक होत आहे. त्यामुळे तिथे काय होते हे पाहून आज, रविवारी किंवा उद्या, सोमवारी याबाबत पुढील घडामोडी होण्याची शक्यता आहे.
हालसिद्धनाथ कारखान्याच्या पहिल्या उचलीबाबत साशंकता
१ निपाणी (ता. चिकोडी) येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेल्या ३१५१ रुपयांच्या पहिल्या उचलीबाबत साखर कारखानदारांतून शनिवारी साशंकता व्यक्त केली. त्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनाही काहींनी फोन करून उचलीबाबत विचारणा केली.
२ या कारखान्याची आर्थिक स्थिती अडचणीची आहे. गतवर्षी कारखान्याने ३००० रुपयांच्या उचलीची घोषणा केली. त्यातील २७०० रुपये दिले; परंतु नंतरचा ३०० रुपयांचा हप्ता वेळेत मिळाला नसल्याची तक्रार आहे. कारखान्यात ५०० कामगार आहेत. त्यांचा आॅगस्टपासूनचा पगार थकीत आहे. अशा स्थितीत या कारखान्याने एवढी उचल कशी जाहीर केली व ते ही रक्कम देणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३ यंदा ऊस कमी आहे व उचल घसघशीत जाहीर नाही केली; तर पुरेसे गाळप होणार नाही, असा विचार करून ही घोषणा केल्याचे सांगण्यात येते. कर्नाटकात संचालक मंडळाने दराबाबत काही निर्णय घेतला तरी त्यास कार्यकारी संचालकांची मंजुरी असल्याशिवाय तो अंतिम मानला जात नाही. हा प्रस्ताव कार्यकारी संचालकांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे समजते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तुम्ही याबाबत अध्यक्षांशी बोलावे, असे सुचविले व बोलण्यास नकार दिला.