शिरोळ तालुक्यात ‘कौन बनेगा सरपंच’ याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:14 AM2021-02-20T05:14:00+5:302021-02-20T05:14:00+5:30
जयसिंगपूर : कोरोनाची महामारी आल्याने अगोदरच ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लांबली. त्यानंतर सरपंच आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने शिरोळ तालुक्यातील सरपंच ...
जयसिंगपूर : कोरोनाची महामारी आल्याने अगोदरच ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लांबली. त्यानंतर सरपंच आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने शिरोळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक लांबणीवर पडली होती. सरपंच आरक्षणावरील हरकतीवर सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिल्यामुळे निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांना पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी २५ फेब्रुवारीची वाट पहावी लागणार आहे.
शिरोळ तालुक्यात ५२ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ९ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. मात्र, तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी येथील चुकीचे आरक्षण टाकल्याच्या तक्रारी न्यायालयात दाखल झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडीला स्थगिती मिळाली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निकाल दिल्यामुळे सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडीवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी काटावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना पुन्हा सहलीवर नेण्याची तयारी सुरू झाली आहे. एकूणच सरपंच निवडीच्या निमित्ताने गावपुढाऱ्यांबरोबर तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.