लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलण्यापेक्षा सध्या जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा अटकाव करणे अतिशय प्राधान्याचे काम आहे. त्याच्याकडेच पूर्ण लक्ष देण्याची गरज असल्याचे रोखठोक मत खासदार धैर्यशील माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. माने यांच्या विधानाचे दोन्ही बाजूंनी पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलले जाणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याआधी अनेकवेळा स्पष्ट केले होते. आता ‘गोकुळ’ची बाजी मारल्यानंतर जिल्हा परिषदेतील कामकाज हाताळणारे शशिकांत खोत आणि अमर पाटील यांनी मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे ४२ ची बेरीज असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे पदाधिकारी बदल होण्याच्या हालचालींना गती आली आहे.
याबाबत आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याशी चर्चा केलेले वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. याचा संदर्भ घेऊन खासदार माने यांनी ही भूमिका मांडली आहे.
माने म्हणाले, सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मृत्यूही आटोक्यात येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे संपूर्ण लक्ष कोरोनाविरोधातील लढाईकडे असण्याची गरज आहे. एकदा का विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले की मग पुन्हा सदस्यांना एकत्र करणे, त्यांना बाहेर नेणे. निवडीचा कार्यक्रम लागल्यानंतर संपूर्ण प्रशासनाचा त्यामध्ये वेळ जाणे हे करण्याची ही वेळ आहे असे वाटत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हे टाळल्यास बरे होईल. एक शिवसेेनेचा खासदार म्हणून माझे हे मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चौकट-
इच्छुकांचे काय
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलानंतर दोन्ही मंत्री, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सदस्यांना पदांची संधी मिळणार आहे. मात्र, खासदार माने यांनी ही भूमिका मांडल्यामुळे एका नव्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. माने यांच्या या भूमिकेमुळे इच्छुक मात्र नाराज होणार आहेत.