सूडबुद्धीनेच जिल्हा बॅँकेची फेरचौकशी
By admin | Published: September 22, 2015 01:06 AM2015-09-22T01:06:58+5:302015-09-22T01:08:13+5:30
हसन मुश्रीफ यांचा आरोप : सुनावणीआधीच न्यायाधीशांचा निकाल; फुंडकरांना राज्य बॅँकेच्या चौकशीत अडकविले
कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांवर ‘८८’ अतंर्गत एकीकडे सुनावणी आहे म्हणायचे आणि दुसरीकडे फेरचौकशी लावण्याची घोषणा करायची, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नेमके काय चालले हेच कळत नसून, केवळ राजकीय सूडबुद्धीने बॅँकेची फेरचौकशी लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. फेरचौकशीची घोषणा करून सुनावणी आधीच न्यायाधीशांनी (मंत्री पाटील) निकाल दिल्याचा टोलाही त्यांनी हाणला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, मंत्री हे अर्धन्यायिक न्यायाधीश असतात, त्यांनी एखाद्या चौकशीबाबत बोलताना फार सावधानता पाळणे गरजेचे असते; पण चौकशी अधिकाऱ्याने दबावाखाली चौकशी केल्याने न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे ‘८८’ अंतर्गत सुनावणीची प्रक्रिया सुरू असताना जिल्हा बॅँकेची फेरचौकशी करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली. सुनावणी आधीच निकाल देऊन पुढची कार्यवाही करणे कोणत्या कायद्यात बसते. मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यांचा आम्हाला न्यायालयात निश्चित उपयोग होईल.
जिल्हा बॅँकेत मी सापडत नाही म्हटल्यावर राज्य बॅँकेत तरी सापडतो का? म्हणून मंत्री पाटील यांनी राज्य बॅँकेची चौकशी लावली असावी, असे मला वाटते; पण त्यांनी काळजी करू नये, राज्य बॅँकेच्या एकाही मिटिंगला हजर नसल्याने माझ्यावर जबाबदारी निश्चित होऊच शकत नाही.
या चौकशीबाबत दुसरी शंका अशी आहे, बुलढाणा जिल्ह्णातील भाजपचे ज्येष्ठ नेते व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक पांडुरंग फुंडकर हे राज्य बॅँकेच्या संचालक मंडळात होते.
या जिल्ह्णात मंत्रिपदासाठी फुंडकर की आमदार चैनसुख संचैती यांच्यात स्पर्धा सुरू आहे. फुंडकर यांचा मंत्रिमंडळातील पत्ता कापण्यासाठी त्यांना राज्य बॅँकेच्या चौकशीत अडकून पाडण्याचा डाव असू शकतो, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महाडिकांमुळेच दादांच्या पोटात गोळा
शिवाजी चौकातील कार्यक्रमात ‘८८’च्या कारवाईतून कोणाला सोडणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले; पण यावेळी त्यांच्या शेजारी महादेवराव महाडिक होते, तेही या कारवाईत आहेत. कदाचित त्यांना पाहूनच दादांच्या पोटात गोळा उठला असेल. महाडिकांनी त्यांना ‘महादेवा’चा प्रसाद द्यावा, असा टोला मुश्रीफ यांनी हाणला.
मग रावळ चांगले कसे?
जिल्हा बॅँकेची चौकशी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सचिन रावळ यांनी केली होती; पण मंत्री पाटील यांच्या मते ही चौकशी दबावाखाली केल्याने नीट होऊ शकली नाही. चौकशीत त्रुटी ठेवल्या, त्या रावळ यांना प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून त्यांनी आणले कसे? दादांना आवडले म्हणूनच त्यांना येथे आणले, असा आम्ही अर्थ काढायचा का? असेही मुश्रीफ यांनी विचारणा केली.
फुरफुरणे, आडवे करतो अशी भाषा दादांनाच जमते, मी सुसंस्कृत माणूस आहे, असा टोला हाणत गेले वर्षभर त्यांनी सुडाच्या राजकारणातच वेळ घालविला आहे. नशिबाने त्यांना मोठी खाती मिळाल्याने त्यांनी आता विधानपरिषदेवर न येता कोल्हापूर शहरातून आमदार व्हावे, त्यासाठी माझ्या शुभेच्छा असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.