लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साधारणपणे ज्योतिबा यात्रा म्हटले की पाऊस येणारच, असा पारंपरिक कयास रविवारी यात्रेच्या पूर्वसंध्येलाच पावसाने खरा करून दाखवला. वादळी वाऱ्यासह आणि गडगडाटासह आलेल्या जोरदार सरींनी जिल्ह्याला दंडवत घातला. रविवारी अचानक आलेल्या या पावसामुळे मात्र वाढलेल्या उष्म्याने हैराण झालेल्या जीवाला मोठा दिलासा मिळाला.
कोल्हापुरात गेला आठवडाभर कोरोनासह उष्णतेचाही कहर सुरू होता. तापमानाचा पारा ३९ अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत होती. रात्रीचे तापमानही ३० अंशापर्यंत राहात असल्याने जीव कासावीस होत होता. रविवारी सकाळी वातावरण स्वच्छ, निरभ्र होते. दोन दिवसांपूर्वी काहीसे ढगाळ वातावरण होते. शिवाय हवामान खात्यानेही सोमवारपासून पुन्हा एकदा वादळी पावसाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज चार दिवसांपूर्वीच वर्तवला होता. या अंदाजाच्या एक दिवस आधीच पावसाने रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात हजेरी लावली. यावेळी दाटून आलेले काळेभोर ढग आणि त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. तासभराहून अधिककाळ झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. याचवेळी आयपीएल मॅच सुरू असल्याने एकाचवेळी पाऊस आणि धावांची बरसात सुरू होती. पण पावसाचा जोर वाढल्याने वीज खंडित केल्यानंतर क्रिकेटप्रेमींना पावसाच्या तुफान बॅटिंगचा आनंद घेतला.
दरम्यान, या अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडवली. सध्या वाळलेल्या वैरणी आणण्याचे काम सुरू आहे, शिवाय उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. पावसात भिजण्यापासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.
हा पाऊस ऊस पिकासाठी मात्र संजीवनी घेऊन आला आहे. सध्या विजेचा लपंडाव आणि वाढत्या उष्म्यामुळे ऊसाची पाण्याची गरज वाढली आहे. विशेषतः भरणी झालेली लावणं व खोडाव्या पिकासाठी हा पाऊस खूपच उपयुक्त ठरणारा आहे.