कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तसेच कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत असून, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने कोल्हापुरात येऊन आढवा बैठक घेऊन उपचाराच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.
याबाबत पवार यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. ही गंभीर बाब आहे. लसीचा व रेमडेसिविरचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्याला अनेक कारणे आहेत, आम्ही समजू शकतो. परंतु, प्रशासकीय स्तरावर याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे, परंतु तसे होत नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर शहरामधील लसीकरणाच्या ठिकाणी होत असलेली प्रचंड गर्दी. यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा निश्चितच वाढल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे महापालिका जबाबदार आहे.
प्रशासकीय स्तरावर समन्वयाचा अभाव व काही प्रमाणात अनास्था या गोष्टींना कारणीभूत आहे. विभागीय आयुक्तांनी कोल्हापुरात तातडीची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, नाहीतर कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींना जबाबदार कोण आहे, कोण नाही, त्यापेक्षा कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त कसा होईल याकडे सर्वांनी मिळून लक्ष द्यावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.