नेत्यांच्या राजकीय साठमारीमध्ये बळी पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:18+5:302021-03-08T04:24:18+5:30
कोल्हापूर : महापालिका आर्थिक संकटात असताना जिल्ह्यातील एका जबाबदार नेत्यांनी महापालिकेचा सुमारे १५ कोटी रुपयांचा घरफाळा बुडविणे ही नक्कीच ...
कोल्हापूर : महापालिका आर्थिक संकटात असताना जिल्ह्यातील एका जबाबदार नेत्यांनी महापालिकेचा सुमारे १५ कोटी रुपयांचा घरफाळा बुडविणे ही नक्कीच गंभीर बाब आहे. अशावेळी राजकीय गटतट बाजूला ठेवून सर्व नगरसेवकांनी महापालिकेच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र काही जबाबदार माजी नगरसेवक विषयांतर करत आहेत. त्यांनी नेत्यांच्या राजकीय साठमारीमध्ये बळी पडू नये, असा टोला माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.
यामध्ये म्हटले आहे की, पालकमंत्र्यांनी महापालिकेचा घरफाळा बुडविल्याचे कागदोपत्री पुराव्यांसह धनंजय महाडिक यांनी उघड केले आहे. त्यानंतर माजी महापौर आणि माजी स्थायी समिती सभापती यांनी मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिकेचे १५ कोटी रुपयांचे घरफाळा उत्पन्न बुडवणाऱ्या नेत्यांचे लांगुलचालन करण्याचा हा प्रकार आहे. धनंजय महाडिक भीमा उद्योग समूहातून सुमारे पाच हजार लोकांना रोजगार दिला आहे. तरीही राजकीय विरोधातून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर केलेली टीका योग्य नाही. महापालिकेचे बुडालेले उत्पन्न कसे वसुल करता येईल, याबद्दल कृतिशील विचार करणे आवश्यक आहे.
आशिष मनोहर ढवळे
माजी स्थायी समिती सभापती