शिरोली : पंचगंगा नदीकाठावर बांधकामे झाली आहेत. पाण्याला फूग लागते आणि परत सहापदरी रुंदीकरणावेळी महामार्गावर भराव टाकला तर नदीकिनारी असणारी गावे पाण्याखाली जाऊन बुडतील; त्यामुळे महामार्गावर भराव नको, अशी मागणी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पुणे-बंगलोर महामार्गावरील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पवार आले असता खवरे यांनी पूरस्थितीची समस्या त्यांच्यासमोर मांडली. खवरे यांनी सांगली फाटा येथे पिलरचा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी केली. त्याला अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदीकिनारी असणारी बांधकामे महापुरास कारणीभूत आहेत. गावे पाण्याखाली जात आहेत. अशीच बांधकामे होत राहिली तर एकवेळ संपूर्ण कोल्हापूर पाण्याखाली जाईल.
भविष्यात सहापदरी रस्ता रुंदीकरणावेळी पुन्हा महामार्गावर १० फूट भराव टाकून उंची वाढविली जाणार आहे. असे झाले तर पंचगंगा नदीकिनारी असणारी गावे पुन्हा पाण्याखाली जातील. त्यामुळे या महामार्गावर भराव न टाकता शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करावा; अशी मागणी खवरे यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे सदस्य उत्तम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कदम, मुन्ना सनदे, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, दीपक खवरे, राहुल खवरे, सतीश पाटील उपस्थित होते.
फोटो : ३१ शिरोली खवरे
कोल्हापूर येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भराव टाकू नका, अशी मागणी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.