ड्रेनेज लाईनवरील मोडकळीस आलेली झाकणे बनली मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:36 PM2017-09-26T14:36:55+5:302017-09-26T16:29:31+5:30
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानवरील मोठ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकीस आल्याने, ही ड्रेनेज लाईन म्हणजे साक्षात मुत्यूचा सापळाच बनला आहे.
कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानवरील मोठ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकीस आल्याने, ही ड्रेनेज लाईन म्हणजे साक्षात मुत्यूचा सापळाच बनला आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुध्दा कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का? असा प्रश्न सामान्य पालकांना पडला आहे.
मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील प्रवेशद्वारासमोरच मोठी ड्रेनेज लाईन गेली आहे. या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकळीस आली आहेत. समोरील केशवराव भोसले नाटयगृह, खासबाग मैदान, खाऊ गल्ली असल्याने या मैदानावर काही वेळेस नागरिक वाहनांचे पार्किंग करतात. या ठिकाणी सकाळ-सांयकाळ खेळण्यासाठी मुलांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते.
या मोडकळीस आलेल्या ड्रेनिज लाईनच्या झाकणाबाबत शाळा प्रशासन आणि पालकांनी वारंवार महानगरपालिका, लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र त्यांची कोणीच दखल घेत नाही. या ड्रेनेज लाईनवरील झाकणे तत्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशी आणि पालकांच्यामधून होत आहे.
गंभीर घटनेनंतरच प्रशासन जागे होणार काय?
मुंबईत प्रसिध्द डॉक्टर दिपक अमरापूरकर यांचा बळी याच कारणांमुळे गेला होता. पावसांच्या पाण्यात रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण काढल्याने ते त्यामध्ये पडून वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तोच प्रकार येथेही घडून गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार काय, असा सवाल नागरिक, पालक करीत आहेत.
शाळा भरताना आणि सुटताना गप्पा मारण्याच्या नादात विद्यार्थी या उघड्या मॅनहोलजवळूनच ये-जा करतात. यावेळी चुकून याठिकाणचे एखादे झाकण उघडे राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही झाकणे दुरुस्त करण्याची गरज आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
ड्रेनेज लाईवरील मोडकळीस आलेल्या झाकणाबाबत वारंवार लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र याची दखल अद्यापपर्यंत कोणीच घेतलेली नाही.
प्रदीप व्हरांबळे,
पालक
प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील मोठ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकीस आल्याने, ही ड्रेनेज लाईन म्हणजे साक्षात मुत्यूचा सापळाच बनला आहे.