लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘ड्रीम वर्ल्ड’ प्रकल्पाकडून महापालिकेचा कोणताही कर थकीत नसून कराराप्रमाणे सर्व रकमेचा नियमाप्रमाणे भरणा करण्यात आला आहे. वर्ल्डची जागा महापालिकेच्या मालकीची असून, ती ज्ञान शांती कंपनीने करारावर घेतली होती. करारावर घेतलेल्या प्रॉपर्टीला घरफाळा लागू होत नाही, असा खुलासा ज्ञान शांती कंपनीचे समन्वयक संजय जाधव यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, शहर सौंदर्यीकरण व पर्यटन विकासाच्या हेतूने ज्ञानशांती कंपनीने ड्रीम वर्ल्ड प्रकल्पाची जागा महापालिकेकडून २० वर्षांच्या कराराने घेतली होती. त्याची मुदत संपल्यानंतर कंपनीने या जागेचा ताबा सोडला आहे. सन २००० मध्ये या जागेबाबत झालेल्या कराराप्रमाणे करार रक्कम व रॉयल्टी कंपनीने ठरल्याप्रमाणे महापालिकेकडे भरणा केली आहे. करार रक्कम व विविध करापोटी आतापर्यंत सुमारे एक कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. शहर, जिल्ह्याच्या विकासात डी. वाय. पाटील ग्रुप नेहमीच अग्रस्थानी आहे. हॉस्पिटल, शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून सामाजिक सेवेमध्ये ग्रुप नेहमीच आघाडीवर आहे. मात्र काही लोक राजकीय आकसापोटी ग्रुपवर धादांत खोटे आरोप करत आहेत.