पिण्याच्या पाण्याचे राजकारण

By admin | Published: April 8, 2016 11:46 PM2016-04-08T23:46:09+5:302016-04-09T00:07:16+5:30

इचलकरंजीत संतप्त प्रतिक्रिया : वारणेतून आरक्षित पाण्याचा उपसा, शेती सिंचनावर परिणाम नाही : हाळवणकर

Drinking water politics | पिण्याच्या पाण्याचे राजकारण

पिण्याच्या पाण्याचे राजकारण

Next

राजाराम पाटील -- इचलकरंजी -तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि आसपासच्या खेडेगावांतील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) परिसरातील काहीजण आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चौगुले राजकीय विरोध करीत असल्याबद्दल इचलकरंजीत शुक्रवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, वारणा नळ पाणी योजनेसाठी इचलकरंजीसाठी आरक्षित असलेलेच पाणी दानोळी येथून उचलले जाणार आहे. त्याचा शेती सिंचन किंवा त्या परिसरातील गावांच्या पाणी कमतरतेवर कसलाही परिणाम होणार नाही, असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हटले आहे.
शहरास पंचगंगा व कृष्णा अशा दोन नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. दोन्हीही नद्यांना भरपूर पाणी असताना दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी उचलून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते. त्यावेळी दोन दिवसांतून एक वेळ पाणी दिले जाते. जानेवारी महिन्यात पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने तेथून पाणी उपसा बंद होतो. त्यामुळे कृष्णा नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. कृष्णा नदी दररोज ४० दशलक्ष लिटर पाणी पुरवत असली तरी दाबनलिकेवरील पाणी गळती आणि पाण्याची चोरी यामुळे प्रत्यक्ष ३५ दशलक्ष लिटर पाणीच जलशुद्धिकरण केंद्रात पोहोचते आणि मग तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणी शहरवासीयांना दिले जाते.
अलीकडील चार वर्षात कृष्णा नदीवर म्हैसाळ योजना झाली आणि तीमधून प्रचंड पाणी कृष्णेतून उचलले जाऊ लागले. त्याचा परिणाम राजापूर बंधाऱ्यासाठी पाणी कमी पडण्यावर झाला. गेल्या दोन वर्षांपासून मे महिन्यात इचलकरंजीसाठी पाणी उपसा करणारे मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील पंप उघडे पडू लागले. त्यामुळे इचलकरंजीस पाण्यासाठी आणखीन पर्यायी जलस्रोत शोधण्यात आले. काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणण्याच्या योजनेस येणारा प्रचंड खर्च (सुमारे ६५० कोटी रुपये) आणि त्यानंतर पालिकेला वीज बिल व देखभाल-दुरूस्ती खर्चही जमणार नाही. म्हणून ‘काळम्मावाडी’ करण्यास शासनानेच नकार दिला. त्यामुळे वारणा नदीतून पाणी आणण्याचा पर्याय समोर आला.
अशा पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पंचगंगा नदीतून पाणी उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला. नदीपात्रात पूर्वीपासूनच असलेल्या बंधाऱ्याला बरगे घालून त्यातून पाणी देण्यात येऊ लागले. पिण्यासाठी पाणी उपसा होत असतानाही बंधाऱ्याचे बरगे काढा, नाही तर कृष्णा योजनेचे नळ फोडू, अशी वल्गना ‘स्वाभिमानी’चे चौगुले यांनी करून राजकीय स्टंट केल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

विरोध गैरसमजुतीतून : वस्तूस्थिती समजून घ्या
दानोळी येथील वारणा नदीतून इचलकरंजीस पाणी उचलण्यास होणारा विरोध गैरसमजुतीतून आहे. वारणा धरणात इचलकरंजी शहरासाठी आवश्यक एक टीएमसी पाण्याचे आरक्षण असून, टप्प्याटप्प्याने सोडलेले पाणी दानोळी येथून उपसा होणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या आणि वारणा काठावरील अन्य गावांसाठी आवश्यक पाण्याचा अंतर्भाव नाही. अशी वस्तूस्थिती असताना दानोळी परिसरातील लोकांना कोणीतरी उठवून बसविले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली. मात्र, आमदार उल्हास पाटील आणि प्रसंगी खासदार राजू शेट्टी यांना विनंती करून तेथील शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली जाईल; पण पिण्याच्या पाण्यासाठी विरोधाचे राजकारण नको, असेही आमदार म्हणाले.

Web Title: Drinking water politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.