नूतनीकरणाअभावी नोंदणीपेक्षा केवळ ३६ टक्केच लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:40+5:302021-04-15T04:23:40+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या झळा सुसह्य व्हाव्यात म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेल्या साडेपाच हजार कोटींच्या पॅकेजमध्ये बांधकाम कामगारांनाही प्रत्येकी १५०० ...

Due to lack of renewal, only 36% of the beneficiaries are registered | नूतनीकरणाअभावी नोंदणीपेक्षा केवळ ३६ टक्केच लाभार्थी

नूतनीकरणाअभावी नोंदणीपेक्षा केवळ ३६ टक्केच लाभार्थी

googlenewsNext

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या झळा सुसह्य व्हाव्यात म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेल्या साडेपाच हजार कोटींच्या पॅकेजमध्ये बांधकाम कामगारांनाही प्रत्येकी १५०० रुपये खात्यावर मिळणार आहेत. तथापि याचा प्रत्यक्ष लाभ होणाऱ्या कामगारांची संख्या एकूण नोंदीत कामगारांच्या ४० टक्के देखील नसल्याची कोल्हापुरातील परिस्थिती आहे. ९० हजार कामगारांची नोंदणी आहे, पण यातील केवळ ३२ हजार ७१५ जणांनी नूतनीकरण केले आहे, उर्वरितांनी नूतनीकरण केले नसल्याने ते लाभापासून वंचित राहणार आहेत. ३६ टक्के कामगार लाभार्थी तर ६४ टक्के वंचित राहणार आहेत.

जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगारांची नोंदणी झाली होती. कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यानंतर लाभाचेही प्रमाण वाढल्याने संघटना व कामगारांचेही पेव फुटले, त्यामुळे अधिकृत कामगार व संघटनाही बऱ्यापैकी मागे पडल्याचेही जिल्ह्यातील वास्तव आहे. अधिकृत संघटनांकडून ६० हजार कामगार असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात ९० हजार जणांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्षात कामगार सहआयुक्त कार्यालयाकडे ३२ हजार ७१५ जणांचीच अधिकृत नोंदणी आहे. यांना १५०० रुपयांचा लाभ दिला तर तो ४ कोटी ९० लाख ७२ हजार ५०० रुपयांचा लाभ आता मिळणार आहे.

चौकट ०१

सरसकट लाभाचा पर्याय

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता नोंदणी झालेल्यांना लाभ देण्याबाबतचा निर्णय शासनाकडून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहेे. तीन वर्षांपर्यंतची नोंदणी गृहीत धरून सरसकट १५०० रुपये देण्याबाबतच्या पर्यायाची चाचपणी होत आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील ९० हजार कामगारांना १३ कोटी ५० लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

चौकट ०२

ऑनलाइन नोंदणीचा पर्याय

कामगार नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. राज्य शासनाच्या महाबीओसी या वेबसाइटवर जाऊन नवीन नोंदणीसह नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सोय कामगार आयुक्त कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया ०१

सरकारने जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत स्वागतार्ह आहे; पण कल्याणकारी मंडळाकडे ११ हजार कोटींची शिल्लक रक्कम पाहता ही मदत ५००० रुपये द्यायला हवी होती.

शिवाजी मगदुम, सिटूप्रणीत बांधकाम कामगार संघटना

प्रतिक्रिया ०२

दोन वर्षांपूर्वी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली होती, पण आजपर्यंत कोणताही लाभ झाला नाही. नूतनीकरण कसे करायचे याबाबतीतही काही माहिती मिळत नाही.

बळी सुतार, बांधकाम कामगार

प्रतिक्रिया ०३

शासनाने जाहीर केलेली मदत कधीपासून द्यायची आहे, याबाबतीत कांही सुचना अजून आलेल्या नाहीत. सक्रीय नाेंदणीकृत असलेल्यांनाच आता येईल त्याप्रमाणे रक्कम खात्यावर वर्ग केली जाणार आहे.

संदेश आयरे, सहआयुक्त, कामगार विभाग

Web Title: Due to lack of renewal, only 36% of the beneficiaries are registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.