अनलॉकमुळे दूध पावडरचे दर आठ दिवसांत २५ रुपयांनी वाढले; दूध संघांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 08:23 AM2021-06-07T08:23:24+5:302021-06-07T08:23:46+5:30
milk powder : कोरोनामुळे सर्वच घटकांवर कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, मोठे लग्न समारंभ हे बंद असल्याने दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे.
- राजाराम लोंढे
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे देशांतर्गत दूध व दूध पावडरची मागणी कमालीची घटल्याने दरात मोठी घसरण झाली होती. मात्र राज्यासह देशात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दूध पावडरच्या दरात आठ दिवसात किलो मागे २५ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र अद्याप किलोमागे ३० ते ४० रुपयांचा फटका दूध संघांना बसत आहे.
कोरोनामुळे सर्वच घटकांवर कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, मोठे लग्न समारंभ हे बंद असल्याने दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर तीन-चार महिने काहीसे सुरळीत झाले होते. मात्र मार्चपासून पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे सगळे ठप्प झाले. दूध हे जीवनाश्यक असल्याने त्याची खरेदी-विक्री सुरू राहिली. मात्र हॉटेल, मोठे समारंभ बंद राहिल्याने गेली तीन महिने दूध अतिरिक्त होत आहे. विशेषत: गाय दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत आहे.
अतिरिक्त दुधापासून पावडर तयार केली जात असून देशात २ लाख टन तर राज्यात ४० हजार टन पावडर पडून आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत पावडरच्या दरात मोठी घसरण झाली. गाय दूध पावडर १८० रुपये किलो तर बटर २५० रुपये किलोपर्यंत खाली आले होते. आता पावडर २०५ तर बटर २६० रुपये किलो आहे.
दूध खरेदी दरात कपात केल्याने शेतकरी हवालदिल
पावडरच्या दरात घसरण झाल्याने राज्यातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. कोल्हापूर व सांगली जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यातील बहुतांशी दूध संघ २० ते २२ रुपये लिटरने दूध खरेदी करत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावडर निर्यातीसाठी अनुदानाची गरज
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियातील दूध पावडर
मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे २२० रुपये किलो दर आहे. परदेशात निर्यात करायची म्हटले तर देशनिहाय वेगवेगळा खर्च येतो. येथील दूध
खरेदी, पावडर प्रक्रियेसह निर्यातीसाठी येणारा खर्च पाहता किमान किलोमागे १५ ते २० रुपये अनुदानाची मागणी होत आहे.