शिवरायांच्या जयघोषात दुमदुमली नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:43+5:302021-02-18T04:40:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी...’ अशा जयघोषात परिसर दुमदुमून गेला.
मिरजकर तिकटी येथून दुपारी बारा वाजता या मिरवणुकीचे उद्घाटन उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल बोंगाळे यांच्या हस्ते झाले. बिनखांबी गणेश मंदिर, कोठीशाळा, अर्धा शिवाजी पुतळा चौक अशी मिरवणूक काढण्यात आली. तिचा समारोप उभा मारुती चौकात झाला. यात माजी नगरसेवक पिंटू राऊत, सचिन चव्हाण, सुरेश जरग, शिवतेज खराडे, अक्षय मोरे, सूरज आमते, अभिषेक शिंदे, पृथ्वीराज सरनोबत, अभिषेक इंगवले, राजू माने, निखील कोराणे आदी शिवभक्त व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जागोजागी अश्वारूढ पुतळ्यावर फुलांची उधळण करण्यात आली. सायंकाळी इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांचे जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, लढावे छत्रपती संभाजी महाराजांसारखे या विषयावर व्याख्यान झाले.
--------------
चौकट..
लक्षवेधी ऐतिहासिक गडाची प्रतिकृती
उभा मारुती चौकात शिवाजी महाराज मोहीम फत्ते करून आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी उजळून गेलेला गड अशी ४५ फुट बाय ६० फुट अशी प्रतिकृती सादर करण्यात आली आहे. विविध रंगांतील एलईडी लाईटचा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामुळे येथील वातावरण उत्साही व लक्षवेधी ठरत आहे. स्टेजवरील सजावट बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे. याचे उद्घाटन सायंकाळी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
--------------
फोटो : १७०२२०२०-कोल-शिवाजी पेठ०१, ०२
ओळी : कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त बुधवारी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)