कोल्हापूर : महानगरपालिका व एकटी संस्थेचे बेघर निवारा केंद्र निराधार व बेघरांकरिता हक्काचे निवारा केंद्र ठरत आहेत. लाॅकडाऊनच्या या काळात १४ जणांना या केंद्रांनी हक्काचा आसरा दिला असून कोविडच्या संबंधित चाचण्या, लसीकरणही येथे केले जात आहे. या बेघरांना कोरोनापासून वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक झालेल्या लाॅकडाऊनने बहुतांश जनता घरात बंद झाली असताना बेघरांची मात्र हक्काच्या निवाऱ्यासाठी वणवण सुरू होती. ही अडचण ओळखून महापालिका व एकटी संस्थेने कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयाच्या समोर बेघर कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यासाठी बेघरांना शोधण्यासाठीची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली गेली. यात उपनगरासह सायबर चौक, सीपीआर परिसर, शनिवार पेठ, आयटीआय, रत्नाप्पाण्णा कुंभार नगर, बिंदू चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, दसरा चौक, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, व्हीनस कार्नर, टाऊन हॉल, पंचगंगा स्मशानभूमी व घाट , रंकाळा, गंगावेश, शालिनी पॅलेस, अंबाई टँक, क्रशर चौक, साने गुरुजी वसाहत, संभाजीनगर, त्रिशक्ती चौक येथे सर्वेक्षण सुरू केले आहे. येथे भटकणाऱ्या बेघरांचा स्वॅब घेऊन, त्यांना लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. रोजच्या आहाराबरोबरच त्यांच्यावर औषधोपचारही केले जात असल्याने या बेघरांनाही कोरोनापासूनच वाचवण्यासाठी संस्था काम करत आहे.