लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : कोणताही गट-तट न मानता, शिक्षक ही एकच जात व सेवा हा एकच धर्म समजून संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. संघटनात्मक कामाच्या जोरावरच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने अल्पावधीतच जिल्ह्यात व राज्यात गरुडझेप घेतली असल्याचे प्रतिपादन संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंद पाटील यांनी केले. संघटनेच्या तालुका शाखा भुदरगडच्या सहविचार सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
प्रसाद पाटील म्हणाले, कै. गोरखनाथ पांढरबळे यांच्या साथीने १९९६ साली या संघटनेत काम करीत असल्यापासून अनेक अडथळे आले; पण त्यावेळी भुदरगड तालुका खंबीरपणे पाठीशी उभा राहिला कालांतराने सर्व जिल्हा पाठीशी उभा राहिला म्हणून आपण अनेक लढे यशस्वी करू शकलो.
यावेळी जिल्हा अध्यक्ष एस. के. पाटील, जिल्हा सरचिटणीस शंकर पवार, कार्याध्यक्ष सुनील पोवार, कोषाध्यक्ष खाडे, जिल्हाप्रमुख संघटक दिगंबर टिपुगडे , जिल्हा सरचिटणीस शारदा वाडकर, महिला राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने व राज्य उपाध्यक्ष दिलीप भोई यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. सभेस राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर, जिल्हा विभागीय उपाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा संघटक नामदेव पाटील, आनंदराव जाधव, नितीन कांबळे, सरचिटणीस जयदीप डाकरे, कार्याध्यक्ष दत्तात्रय रेपे, कोषाध्यक्ष संतोष डवरी, महिला अध्यक्षा वैशाली केळसकर, सरचिटणीस- रूपाली ढेरे, उपाध्यक्ष अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष नारायण कोटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुकाप्रमुख संघटक दिग्विजय कोटकर यांनी आभार मानले. राज्य संघटक पी. आर. पाटील यांनी सूत्रसंचलान केले.