कोल्हापूरमधील २६१ उद्योगांच्या प्रारंभामुळे अर्थचक्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 06:25 PM2020-04-28T18:25:39+5:302020-04-28T18:26:57+5:30
जिल्हा प्रशासन म्हणून आमचे सर्व सहकार्य राहणार आहे. अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यासह कोरोनाच्या संकटात कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, कारखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर / शिरोली : लॉकडाऊनमुळे बंद असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटे-मोठे असे २६१ उद्योग मंगळवारपर्यंत सुरू झाले आहेत. त्याद्वारे रोजगार सुरू झाल्याने ४१६६ कामगारांना दिलासा मिळाला आहे. उद्योग सुरू झाल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. उद्योग सुरू होण्याची कोल्हापूरमधील संख्या ही पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संकेतस्थळावरून मंगळवार दुपारपर्यंत १३३४ उद्योजकांनी परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज केला असून त्यातील ६६७ जणांना परवानगी मिळाली आहे. त्यांपैकी शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, चंदगड, आदी परिसरांतील औद्योगिक वसाहतींतील २६१ उद्योग हे ४१६६ कामगारांच्या माध्यमातून सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील जनता कर्फ्यू आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे गेल्या ३८ दिवसांपासून कोल्हापूरमधील उद्योग क्षेत्राची चक्रे थांबली. शासनाच्या परवानगीने आता टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अर्थकारणाला गती मिळणार आहे.
शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींत तब्बल महिन्यानंतर काही प्रमाणात कारखाने सुरू झाले. काम सुरू झाल्याचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून आला. सध्या ३० ते ४० टक्के कामगारांवर आणि एका शिफ्टमध्ये काम सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ होणार आहे. परवानगी घेतलेले सर्व उद्योग सुरू होण्यासाठी १८,९७० कामगारांची आवश्यकता आहे. ५५४ जणांनी वाहतुकीच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यांपैकी बस, मिनीबस यांच्यासाठी २४० वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
सुरू झालेले उद्योग
जीवनावश्यक वस्तू उत्पादनांच्या १३५ कारखान्यांसह मोठ्या फौंड्री उद्योगातील मशीनशॉप, फेटलिंग शॉप, पॅकिंग युनिट, पेंटिंग शॉप, सूतगिरणी असे उद्योग सुरू झाले आहेत. कच्चा माल आणि कामगारांच्या उपस्थितीनुसार बहुतांश उद्योजक त्यांचे कारखाने सुरू करीत आहेत.
‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखून काम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कामगारांकडून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखून कारखान्यांमध्ये काम करण्यात येत आहे. शिरोली औद्योगिक वसाहत परिसरातील कारखान्यांमध्ये नागाव, शिरोली, आदी परिसरांतून चालत काही कामगार कामावर आले. काही मोठ्या उद्योगांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत मिनी बस, स्वतंत्र वाहनांद्वारे कामगारांना आणले.
जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायाला परवानगी देण्याचे धोरण राज्य शासनाने घेतले आहे. जिल्ह्यातील उद्योजकांना लवकरात लवकर कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत १३३४ जणांनी परवानगीसाठी अर्ज केले आहे. परवानगी मिळालेल्या ६६७ जणांपैकी २६१ कारखानदारांनी ४१६६ कामगारांच्या सहाय्याने कारखाने सुरु केले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जिल्हा प्रशासन म्हणून आमचे सर्व सहकार्य राहणार आहे. अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यासह कोरोनाच्या संकटात कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, कारखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची आणि प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्याची कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे. पुणे विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरची आकडेवारी सर्वाधिक आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उद्योग, कारखान्यांमध्ये काम सुरू आहे.
- धनाजी इंगळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, कोल्हापूर.
..........................................................................................
लॉकडाऊनमुळे गेल्या ३८ दिवसांपासून जिल्ह्याचे अर्थचक्र थांबले आहे. उद्योग सुरू झाल्याने त्याला आता गती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाचे आवश्यक ते सहकार्य मिळत आहे. उद्योगांना सध्या भेडसावत असलेल्या काही अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीने केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज
.......................................................................................................
कारखान्यांबरोबरच आमचे काम सुरू झाल्याने आम्हांला आनंद झाला असून मोठा दिलासा मिळाला आहे. फिजिकल डिस्टन्सिंग राखून, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करून आम्ही काम करीत आहोत.
-रवी कांबळे, कामगार, शिरोली एमआयडीसी