खोची : आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना सहकार्य करा. अनुदान तत्त्वावरील योजनांचा प्रचार, प्रसार हातकणंगले तालुक्यातील गावागावांत करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना आमदार राजू आवळे यांनी दिल्या.
पूरपरिस्थितीनंतरची व खरीप हंगामातील पिकांच्या अवस्थेचा आढावा कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर ही बैठक झाली. यावेळी आमदार आवळे यांनी संवाद साधला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक अडचणी मांडल्या. आवळे म्हणाले, महापुराने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक उन्नती होण्यासाठी नावीन्यपूर्ण शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना माहिती दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या कृषी विभागाच्या योजनांची अमंलबजावणी झाली पाहिजे.
रोजगार हमी योजनाअंतर्गत गांडूळ खत युनिट, कंपोस्ट खत, ठिबक व तुषार सिंचन, फलोत्पादन अभियानअंतर्गत हरितगृह उभारणी, खरीप हंगामातील पीक स्पर्धा, गोठा बांधणी याविषयी सविस्तर माहिती कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितली. योजना राबविताना येणाऱ्या अडचणी सांगून मार्गदर्शन काही दुरुस्त्या होणे गरजेचे आहे असे सूचित केले.
यावेळी बाजार समिती सभापती चेतन चव्हाण, शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पाटील, रणजित निकम, राहुल पाटील, शहाजी पाटील, मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ, कृषी पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, सुधीर वठारे, संतोष पाटील, महादेव जाधव, अजय भंडारी उपस्थित होते.
फोटो ओळी-हातकणंगले तालुक्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेताना आमदार राजू आवळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार मिसाळ, रामचंद्र पाटील, महादेव जाधव, सुधीर वठारे, संतोष पाटील, महादेव जाधव, अजय भंडारी उपस्थित होते.