इचलकरंजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी झेंडा चौक गणेशोत्सव मंडळातील नगरसेवकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे. नगरसेवक अमरजित राजाराम जाधव, अजित महादेव जाधव, अर्थव उरुणकर, योगेश पवार, संकेत कांबळे, संकेत डंबे, निलेश जाधव, गौरव जाधव (सर्व रा. झेंडा चौक) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, राजवाडा चौक परिसरातील झेंडा चौक गणेशोत्सव मंडळाने मंगळवार (दि.१४) सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. यानिमित्त मंडपासमोर एलईडी लाईट, फोकस, लेजर शो करण्यात आला. यावेळी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोकांची गर्दी जमवत कोरोना नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव कालावधीत कोरोनाच्या अनुषंगाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.