जिल्ह्यातील २३६ सरपंचांच्या गुरुवारी निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:06 AM2021-02-20T05:06:22+5:302021-02-20T05:06:22+5:30
कोल्हापूर : आरक्षणावरील हरकतीमुळे स्थगित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३६ ग्रामपंचायतींतील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी येत्या गुरुवारी (दि.२५) होत ...
कोल्हापूर : आरक्षणावरील हरकतीमुळे स्थगित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३६ ग्रामपंचायतींतील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी येत्या गुरुवारी (दि.२५) होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भूदरगडमधील आरक्षण बदलणाऱ्या ६० ग्रामपंचायती वगळून या निवडी होणार आहेत. या गावांच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम आरक्षण जाहीर झाल्यानंतरच होणार आहे. दरम्यान भूदरगडच्या फेरआरक्षण सोडतीचा आदेश सोमवारी (दि.२२) काढला जाणार आहे.
जिल्ह्यात निवडणूक झालेल्या ४३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांच्या निवडीचा कार्यक्रम ९ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला होता; पण पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज, शिरोळ, शाहूवाडी, भूदरगड या सहा तालुक्यांतील ९ गावांनी आरक्षण सोडतीवर हरकत घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या निवडी १६ पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. दरम्यान न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या सर्व गावांची सुनावणी प्रक्रिया करून निकाल दिला.
यात भूदरगड तालुक्यातील फणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण बदलल्याने तेथील ६० गावांतील सरपंचपदाचे फेरआरक्षण निघणार आहे. उर्वरित सर्व आठ गावांतील हरकती फेटाळल्या आहेत. त्यामुळे सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अपेक्षेप्रमाणे गुरुवारी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीत निवड सभा घेऊन या निवडी पूर्ण कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे. आरक्षण सोडत निघाल्याच्या ३० दिवसांच्या आत निवडी करणे बंधनकारक असल्यानेच हा निवड कार्यक्रम तातडीने घेण्यात आला आहे.
चौकट ०१
भूदरगडमधील ७६ पैकी ६० गावांतील सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द झाल्याने सरपंचपदाचे फेरआरक्षण निघणार असल्याने उर्वरित १६ गावांतच निवडणूक होणार आहे. करवीर ५४, शाहूवाडी ४१, शिरोळ ३३, गडहिंग्लज ५०, पन्हाळा ४२ अशा एकूण २३६ गावांतील सरपंच, उपसरपंच निवडी होत आहेत.
चौकट ०२
सरपंच निवडीवरील स्थगिती उठल्याने आणि निवड कार्यक्रम जाहीर झाल्याने या २३६ गावांमध्ये आता राजकीय वातावरण तापणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. पी.एन. पाटील, आ. विनय कोरे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या तालुक्यात आता पुढील सात दिवस प्रतिष्ठेचे असतील. या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपापल्या तालुक्यात सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत; पण आता सरपंच निवड करताना प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.