कोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:04 AM2018-12-10T11:04:31+5:302018-12-10T11:07:18+5:30
नगरसेवकांना ओळखपत्र पाहून कोल्हापूर महानगरपालिकेत प्रवेश देण्याच्या कारणावरून आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची पोलिस प्रशासनाबरोबर सोमवारी वादावादी झाली.
कोल्हापूर : नगरसेवकांना ओळखपत्र पाहून महानगरपालिकेत प्रवेश देण्याच्या कारणावरून आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची पोलिस प्रशासनाबरोबर सोमवारी वादावादी झाली.
दरम्यान, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी रामाणे यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. या निवडीच्या दरम्यान महानगरपालिका परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अश्विनी रामाणे यांना मतदानाचा अधिकार नाकारला
महापौर निवडीसाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात दाखल झाले. त्यावेळी सुरक्षेच्या कारणावरून पोलिस हे नगरसेवकांना त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना आत सोडत होते.
ओळखपत्र पाहून आत सोडण्यावर आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी आक्षेप घेतला. मात्र, पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यावरून आमदार मुश्रीफ, आमदार पाटील यांची पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यात वादावादी झाली.
यावेळी पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी आम्ही नोकरी करतो. राजकारण करत नाही. काहीही बोलू नका असे आमदार मुश्रीफ यांना सांगितले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.