लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पहिल्या लॉकडाऊनच्या फटक्यातून सावरत नाही तोवर दुसऱ्या लॉकडाऊनने महावितरणच्या डोक्यावरील थकबाकीचा डोंगर तब्बल २३९ कोटींनी वाढविला आहे. खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने महावितरणने वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली आहे, तर कामधंदाच बंद आहे, तर बिल कसे भरू असे सांगत ग्राहकांकडूनही टोलवाटोलवी सुरू आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहीर झालेला लॉकडाऊन जूनपर्यंत कडक अमलात आल्याने वीज थकबाकीचे आकडे कोटीच्या घरात वाढत गेले. हा आकडा एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात सातशे कोटींवर पोहोचला. त्यानंतर ग्राहकांचा असहकार, राजकीय आंदोलने, सरकार पातळीवर बैठका अशा सर्व घटना पाहतपाहतच महावितरणने वसुलीचा धडाका सुुरू केला. हप्ते पाडून देण्याचीही सोय केली, दोन टक्क्यांच्या सवलतीही दिल्या. परिणामी मार्च ते जून या काळात वाढलेला थकबाकीचा आकडा या मार्चपर्यंत १६४ कोटींपर्यंत खाली आला. बऱ्यापैकी वसुली संपत आली असतानाच एप्रिलपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आणि महावितरणच्या वसुली प्रयत्नांवर पाणी फिरले. ग्राहकांनीही मागची बिले भरण्यासाठी हात आखडता घेतला असतानाच चालू बिले भरण्यासही टाळाटाळ सुरू केली. परिणामी थकबाकीचा आकडा ४०३ कोटींवर पाेहोचला आहे. यात मागील वर्षाचे १६४ कोटी वजा केले तर एप्रिल ते जून या दोन महिन्यांत २३९ कोटींनी थकबाकीत भर पडल्याचे दिसत आहे. आता एवढ्या प्रमाणावर असलेली थकबाकी वसूल कशी करायची असा प्रश्न महावितरणसमोर आहे.
चौकट
वीज कर्मचारी ग्राहक यांच्यात वादावादी
वीज बिल भरण्यासंदर्भात व कनेक्शन तोडण्यासंदर्भात सात दिवसांची नोटीस अशी आतापर्यंतची महावितरणची कार्यवाही होती, पण आता मात्र कोणतीही नोटीस न पाठविता, हप्त्यांची सवलत न देता वसुलीसाठी कर्मचारी दारात उभे राहत आहेत. लगेच कनेक्शन कट करण्याचीही कारवाई केली जात असल्याने विशेषत: औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक वैतागला आहे. यावरून कर्मचारी व ग्राहक यांच्यात वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.
चौकट
सरकारी कार्यालयेही थकबाकीत आघाडीवर
महावितरणचे ५ लाख ७६ हजार ग्राहक थकबाकीत असले तरी त्यातील ९ हजार ९०२ ग्राहक हे सरकारी आहेत, त्यांच्याकडे तब्बल १५४ कोटींचे वीज बिल थकबाकी आहे. यात सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवा यांचा समावेश आहे. एका बाजूला घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांमागे वसुलीचा तगादा लावला जात असताना या सरकारी कार्यालयांकडील वसुलीचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
चौकट
ग्राहकनिहाय थकबाकी
ग्राहक संख्या थकबाकी रक्कम
घरगुती : ४ लाख ९२ हजार : १३९ कोटी
वाणिज्य : ५१ हजार ४७० : ३३ कोटी ६४ लाख
औद्योगिक : २० हजार ७८० : ७४ कोटी
पथदिवे : २ हजार ९१५ : ६६ कोटी ८८ लाख
सार्वजनिक पाणीपुरवठा : २ हजार ७१२ : ८३ कोटी ९२ लाख
सार्वजनिक सेवा : ४ हजार २७५ : ३ कोटी २२ लाख