कोल्हापूर : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण करून कंत्राटी नोकरभरती करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. हा निर्णय युवकांचे भविष्य उद्धवस्त करणारा आहे. त्यामुळे हा आदेश तत्काळ रद्द करावा. यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्विकारले.राज्य शासनाने शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करून कंत्राटी नोकर भरतीचे अध्यादेश काढले आहेत. ते त्वरीत रद्द करावेत. यासह राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा योजना अंतर्गत राज्यातील ६२ हजार शाळांचे खाजगीकरणाचा शासन निर्णय आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम ४५ नूसार मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार असताना हे सरकार खासगीकरण करून विद्यार्थी पालकांची पिळवणूक करण्याचा घाट घालत आहे. हा निर्णय मागे घेवून सरकारनेच ही व्यवसथा करावी. केंद्र शासनाची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे केली जाते. त्याप्रमाणेच राज्यातील नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फ करावी. स्पर्धा परीक्षांचे शुल्क ९०० ते १००० रूपये इतके आहे. ते कमी करून सर्वच परीक्षांचे शुल्क १०० रूपये करावी. बार्टी, महाज्योती, सारथी व परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती वेळेत द्यावी. पेठवडगाव प्रस्तावित शहर विकास आराखडा हा चुकीच्या आराखडा रद्द करावा. तळसंदेतील मागासवर्गीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारावर त्वरीत कारवाई करावी. आदी मागण्यांचा समावेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात होता.या मोर्चाची सुरुवात दुपारी एक वाजता दसरा चौकतून झाली. दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा व्हीनस काॅर्नर- असेम्बली रोड, जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. उपस्थित कार्यकर्त्यांनी खासगीकरणाविरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, दिपक कांबळे, आकाश कांबळे, दशरथ दिक्षांत, मनिषा कांबळे, तुषार कांबळे, सुरेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोकऱ्यांच्या खासगीकरणविरोधात कोल्हापुरात ‘वंचित बहुजन’चा एल्गार
By सचिन भोसले | Published: October 05, 2023 5:46 PM