corona virus : कर्मचारी पॉझिटिव्ह, बँकेचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 02:15 PM2020-12-05T14:15:08+5:302020-12-05T14:43:26+5:30
Coronavirus, bankingsector, ratnagirinews खेड शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून या शाखेतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.
खेड : शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून या शाखेतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.
दरम्यान, पॉझिटिव्ह आलेला कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने खेडमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास होत असलेल्या या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हा कर्मचारी तोपर्यंत बँकेमध्ये अनेकांच्या संपर्कात आल्याने आणखी काहीजण बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारा खेड तालुका पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात तर अडकणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी बँकेचे ग्राहक नेहमीप्रमाणे बँकेत आर्थिक व्यवहारासाठी आले. मात्र, बँकेच्या प्रवेशद्वारावर बँकेत कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी सापडल्याने बँकेचे सर्व कामकाज बंद राहील असा सूचना फलक लावण्यात आला होता.
बँकेचे सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र मोठी गैरसोय झाली. अखेर पैशाची निकड असलेल्या काही ग्राहकांनी थेट फुरूस येथील शाखेत हजेरी लावली. मात्र, तिथेही बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांच्या पदरी निराशाच आली.
खेड येथील बँकेची शाखा आणखी किती दिवस बंद राहणार, हे सूचना फलकावर नमूद केलेले नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम वाढला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. बँकेने याबाबतची स्पष्ट कल्पना ग्राहकांना द्यावी आणि त्याचबबरोबर आता खबरदारीच्या सर्व उपाययोजनाही कराव्यात, अशी अपेक्षा ग्राहकांकडून केली जात आहे.