कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:40 PM2019-01-04T17:40:51+5:302019-01-04T17:49:49+5:30
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र केली असून, या कारवाईत रस्त्यावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र केली असून, या कारवाईत रस्त्यावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.
शुक्रवारी लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्यावरील टपऱ्या या कारवाईत तोडण्यात आल्या. अतिक्रमण कारवाईत महापालिका कर्मचाऱ्यानी रस्त्यावर मांडलेले साहित्य जप्त केले. महानगरपालिकेच्या वतीने या परिसरांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवेळी या परिसरातील अनधिकृत केबिन्स, होर्डिंग, बॅनर्स व जाहिरात फलक काढण्यात आले.
दरम्यान, चारीही विभागीय कार्यालयांतर्फे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू असली तरी व्यावसायिक पुन्हा अतिक्रमण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेच्या चारीही विभागीय कार्यालयांमार्फत शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या दहा-बारा दिवसांपासून राबविण्यात येत आहे. कारवाईची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
विनापरवाना अतिक्रमण हटविण्याची कारवाई चालूच राहणार असून संबंधितांनी अनधिकृत जाहिरात फलक, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स त्वरित काढून घेण्यात यावेत; अन्यथा संबंधितांवर महानगरपालिका मालमत्ता विद्रूपीकरण अधिनियमानुसार फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.