माणूस जंगलात अन् गवे गावात, संघर्ष टाळण्याची गरज
By संदीप आडनाईक | Published: September 22, 2022 07:13 PM2022-09-22T19:13:36+5:302022-09-22T19:14:12+5:30
गवे आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याची काही कारणे आहेत. हा संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्य परिसरात असलेल्या ग्रामस्थांचा मुख्य प्रश्न आहे, तो गव्यांचा. गव्यापासून होणाऱ्या त्रासांचा आणि नुकसानीचा. गेल्या काही वर्षांपासून गवे वनक्षेत्रापासून जवळच्या मनुष्यवस्तीत व गावांमध्ये शिरून, शेतीचे नुकसान करीत आहेत. माणसांवर जीवघेणे हल्ले करीत आहेत. यामुळे गवा-मानव संघर्ष वाढीस लागले आहेत. गवे आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याची काही कारणे आहेत. हा संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे.
अभयारण्यातील कोअर झोनमध्ये काही नैसर्गिक जलसाठे आहेत. जिवंत झरे आहेत. गव्यांसाठी हेच महत्त्वाचे पाण्याचे स्रोत. गव्यांसाठी हेच पाणी आवश्यक असताना या झऱ्यांचे पाणी सायफन पद्धतीने खाली आणून अभयारण्यातील वाड्या-वस्त्यांना, गावांना पुरविले जाते. यामुळे गव्यांना पाणीटंचाईमुळे, पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासातून बाहेर यावे लागते. गव्यांना आवश्यक असलेल्या अन्नाच्या टंचाईमुळेही अन्नाच्या शोधात गव्यांना अधिवासातून बाहेर पडावे लागते.
गव्यांचे खाद्य वन विभागानेच टाकले होते जाळून
- अभयारण्यातील कारवी या वनस्पतींचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने गव्यांचे चराऊ क्षेत्र कमी होत आहे. यामुळे गवे चाऱ्याच्या शोधात त्यांच्या अधिवासातून बाहेर पडत आहेत, या समजुतीतून कोल्हापूर वन्यजीव विभागाने सन २००९ मध्ये येथील कारवीची तोड करून, कारवी जाळली होती.
- या चुकीच्या कृतीला निसर्ग अभ्यासकांनी व तज्ज्ञांनी आक्षेप घेऊन, कारवीची पुढील तोड थांबवली होती. कारवीची कोवळी पाने गव्यांचे खाद्य आहे, हे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. कारवी सात वर्षांनी एकदाच फुलते व नंतर वाळून जाते. यामुळे कारवीची दरवर्षी वाढ होऊन ती वेगाने सर्वत्र पसरते.
- हा वन विभागाचा समजही शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे, हे पटवून दिले होते. अभ्यासक व तज्ज्ञ समितीने गव्यांच्या खाद्य वनस्पतींबाबत अभ्यास करून त्यांच्या यादीसहित सविस्तर शास्त्रीय अहवाल वन विभागास सादर केला होता.
अभयारण्यात आणि त्याच्या शेजारी असलेली गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी गावाजवळच भाताची व उसाची शेती केली आहे. यामुळे येथील गवे आणि इतर तृणभक्षी वन्यप्राण्यांना हिरवागार चारा वर्षभर उपलब्ध झाल्याने हे सर्व वन्यप्राणी मानवी वस्त्यांतील पिकांचे नुकसान करू लागले. या क्षेत्रातील ग्रामस्थ, त्यांची पाळीव जनावरे, चोरटे शिकारी, हौशी पर्यटक यांचे बेकायदेशीरपणे अभयारण्यात शिरण्याचे प्रमाणही वाढले आहे. - डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरणतज्ञ