सम्राटनगर ओढ्यातील अतिक्रमण हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:36+5:302021-06-30T04:16:36+5:30
कोल्हापूर : सम्राटनगर येथील केदार अपार्टमेंटच्या मागील बाजूस नाल्यावर असलेले अनाधिकृत बांधकाम मंगळवारी नगररचना प्रशासन आणि अतिक्रमण विभागातर्फे काढण्यात ...
कोल्हापूर : सम्राटनगर येथील केदार अपार्टमेंटच्या मागील बाजूस नाल्यावर असलेले अनाधिकृत बांधकाम मंगळवारी नगररचना प्रशासन आणि अतिक्रमण विभागातर्फे काढण्यात आले. ही कारवाई दोन जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यासाठी दिरंगाई होत असल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या (आप) येथील पदाधिकारी आंदोलन केले होते. सोमवारी नगरचना प्रशासनास जाबही विचारला होता. याची दखल घेवून महापालिका प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली.
सम्राटनगर येथे केदार अपार्टमेंटचे नाल्यामध्ये अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महापालिका नगररचना विभागाकडे केली होती. या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी आजूबाजूच्या घरातही जाते. तरीही अतिक्रमण हटवण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत राहिले. यामुळे आपच्या पदाधिकाऱ्यांनी नाल्यात उतरून आंदोलन केले. त्यानंतर नगररचना विभागाने जागेवर जात पाहणी केली होती. त्यानंतरही अतिक्रमण काढण्यास विलंब होत असल्याने आपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगररचनेच्या अधिकाऱ्यास जाब विचारला. त्यानंतर महापालिका यंत्रणे जाग आली. त्यांनी अतिक्रमण जमीनदोस्त केले.
उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, उमेश बागुल, सर्व्हेअर तानाजी गेजगे, अतिक्रमण विभागाचे पंडित पवार यांनी ही कारवाई केली.
फोटो : २९०६२०२१-कोल- कारवाई
कोल्हापुरातील सम्राटनगर येथील केदार अपार्टमेंटच्या मागील बाजूस नाल्यावर असलेले अनधिकृत बांधकाम नगररचना प्रशासन आणि अतिक्रमण विभागातर्फे काढण्यात आले.